लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी तीन वर्षांपासून अधिक काळ नेमणूक असलेल्या राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरही निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले असून या बदल्यांचे आदेश उद्यापर्यंत निघण्याची शक्यता गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. मुंबई हल्ल्यात शहीद झालेले अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे यांच्याजागी नीतेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असून ठाण्याच्या सहपोलिस आयुक्तपदी विनोद लोखंडे यांची नेमणूक झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकाच ठिकाणी तीन वर्षांहून अधिक काळ नियुक्ती असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे अपेक्षित होते. आयपीएस अधिकाऱ्यांपासून सहाय्यक पोलिस निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांपर्यंतच्या 470 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार होत्या. मात्र आचारसंहिता लागल्याने या बदल्या राज्य निवडणूक आयोगाच्या कात्रीत अडकल्या होत्या. या बदल्यांना निवडणूक आयोगाने नुकताच हिरवा कंदील दाखविला आहे. नवीन बदल्यांनुसार श्रीकांत सावरकर यांची पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात नियुक्ती झाली आहे. सुरिंदर कुमार यांची नागपूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक, जवाहर सिंग यांची "म्हाडा'चे महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. रघुनाथ खैरे यांची परभणीचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यावर निर्णय घेण्यात आला आहे. या व्यतिरिक्त शहाजी उमाप यांची नांदेड तर श्रीमती निकम यांची कोल्हापूरच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. नवी मुंबईच्या गुन्हे शाखेत पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रवीण पवार यांची राज्य उत्पादन शुल्क खात्यात बदली करण्यात आल्याचे खात्रीलायक समजते. या बदल्यांचे आदेश उद्या निघणे अपेक्षित असल्याचे गृहखात्यातील सूत्रांनी सांगितले.
(sakal,2april)
No comments:
Post a Comment