शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आमदार सुरेश गंभीर यांनी आज दुपारी दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातील विद्यमान खासदारांनी केलेल्या कामांबाबत नागरिकांत असंतोष आहे. त्यामुळे आपल्याला विजयाची खात्री आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश गंभीर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार गंभीर यांनी आपल्या प्रचाराला सुरवात केली. शिवसेना-भाजप युतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गंभीर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भोसले आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांच्यासमवेत पत्नी, मुलगी आणि शिवसेना-भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी महापौर डॉ. शुभा राऊळ यादेखील त्यांच्यासोबत होत्या. आचारसंहितेमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारासोबत फक्त चार प्रतिनिधी पाठविले जातात. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या "अडवानी-उद्धव कमल निशाण, मांग रहा है हिंदुस्तान', "शिवसेना - भाजपा युतीचा विजय असो' यांसारख्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. निवडणुकीशी संबंधित कागदपत्र तसेच प्रतिज्ञापत्रांवर सह्या करून बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा घोषणाबाजीला सुरवात केली.
या वेळी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू असे सांगितले. या मतदारसंघातील विद्यमान खासदारांच्या अकार्यक्षमतेमुळे दलितवर्ग आणि युवाशक्तीही आपल्या पाठीशी आहे. याशिवाय शिवसेना व भारतीय जनता पक्षातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तळमळीने काम करीत असल्याने या निवडणुकीत आपला विजय पक्का असल्याचे आमदार गंभीर या वेळी म्हणाले.
(sakal,4 april)
No comments:
Post a Comment