Wednesday, April 15, 2009

टाटा इन्स्टिट्यूट'च्या परदेशी विद्यार्थिनीवर बलात्कार

पोलिसांची माहिती : तीन विद्यार्थ्यांना अटक; तीन फरारी

देवनार येथील "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस'मध्ये शिकत असलेल्या एका परदेशी विद्यार्थिनीवर तिच्या ओळखीच्याच सहा विद्यार्थ्यांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी तिघा जणांना अटक केली असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती परिमंडळ-6चे पोलिस उपायुक्त दिलीप सावंत यांनी दिली. फरारी असलेल्या विद्यार्थ्यांच्या शोधार्थ पोलिसांची पथके बिहार आणि झारखंड येथे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

देश-विदेशातील विद्यार्थ्यांना समाज विज्ञानाचे धडे देण्यात अग्रेसर असलेल्या या संस्थेच्या विद्यार्थ्याबाबत घडलेल्या या घृणास्पद प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रातही एकच खळबळ उडाली आहे.

समाज विज्ञानाचे धडे घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी अमेरिकेहून ही विद्यार्थिनी "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस'मध्ये दाखल झाली होती. शनिवारी रात्री उशिरा आपल्या सहा मित्रांसोबत ती गोवंडी येथे गेली. तेथील एका हॉटेलमध्ये मित्रांसोबत तिने यथेच्छा मद्यप्राशन केले. यानंतर पबमध्ये जाण्याच्या बहाण्याने मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या मित्रांनी तिला अंधेरी येथे नेले. अंधेरीच्या पबमध्ये रात्रभर मौज केल्यानंतर जवळच असलेल्या एका घरात ती मित्रांसोबत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मित्रांनीच तिच्यावर बलात्कार केल्याचे तिच्या लक्षात आले. बलात्काराच्या या घटनेनंतर ती पुन्हा "टाटा इन्स्टिट्यूट'मध्ये आली. काल सकाळी तिने इन्स्टिट्यूटच्या संचालकांची भेट घेऊन त्यांना घडलेल्या प्रकाराची इत्थंभूत माहिती दिली. संचालकांच्या सल्ल्यानुसार तिने मध्यरात्री उशिरा ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात बलात्कार करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून तिघा जणांना अटक केली आहे. अटक केलेले तिघेही तिच्याच सोबत शिक्षण घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेची अधिक चौकशी सुरू असून आणखी तिघा जणांचा शोध सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त अजित सावंत यांनी सांगितले.

याबाबत "टाटा इन्स्टिट्यूट'शी संपर्क साधला असता हा दुर्दैवी प्रकार 11 एप्रिलच्या रात्री संस्थेच्या आवाराबाहेर घडला असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची बळी ठरलेल्या त्या अमेरिकन विद्यार्थिनीला आवश्‍यक ती कायदेशीर मदत आणि समुपदेशन देणार असल्याची माहिती संस्थेच्या संचालक कार्यालयातून देण्यात आली. टाटा इन्स्टिट्यूट नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि हित जपत आली आहे. पीडित विद्यार्थिनीचा आत्मसन्मान जपण्याकरिता तिची ओळख पटू नये यासाठी प्रसिद्धिमाध्यमांनीही सहकार्य करण्याचे आवाहनही संस्थेच्या प्रसिद्धिपत्रकात करण्यात आले आहे. विद्यार्थिनीवर बलात्कार करणारे सहा विद्यार्थी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सशी संबंधित असल्याबाबत संस्थेकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

(sakal,16 april)

No comments: