Wednesday, April 15, 2009

वयोवृद्ध महिलेची घरात शिरून हत्या

पासष्ट हजारांचे दागिने लंपास

व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेची घरात एकटीच असताना अनोळखी व्यक्तीने गळा चिरून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार काल (ता. 13) रात्री अंधेरीच्या यारी रोड येथे घडला. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अनोळखी मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ताराबेन मुलजी कोठारी (75) असे मृत महिलेचे नाव असून, चोरट्यांनी हत्येनंतर तिच्या अंगावरील 65 हजारांचे दागिने चोरून नेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यारी रोड येथील कविता अपार्टमेंटमध्ये घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. समाजातील भाजीवाले, रिक्षावाले आदी अल्प उत्पन्न घटकांतील व्यक्तींना व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करणाऱ्या ताराबेन त्यांच्या मुलीसोबत यारी रोड येथील घरात राहत होत्या. चार्टर्ड अकाऊंटंट असलेली त्यांची मुलगी दीप्ती (वय 40) वांद्रे-कुर्ला संकुलातील एका कंपनीत कामाला आहे. चार महिन्यांपासून त्यांच्या घरात दुरुस्तीचे काम सुरू आहे. काल सायंकाळी घरात पेंटिंगचे काम करणारा कामगार आणि घरकामाला असलेली महिला काम संपवून निघून गेले होते. त्यामुळे ताराबेन घरात एकट्याच होत्या. रात्री साडेआठच्या सुमारास दीप्ती घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे आढळले. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्यांना दिसल्या. ताराबेन यांच्या मानेवर शस्त्राने गंभीर वार करण्यात आले होते. त्यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्यापूर्वीच त्या मृत पावल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.
ताराबेन यांच्या व्याजाने पैसे देण्याच्या व्यवसायातूनच त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या या व्यवसायाला आक्षेपही घेतला होता. शेजारी राहणाऱ्या विवेक पाटील या अपंग व्यक्तीनेही ताराबेनकडे येणाऱ्यांच्या वर्तनाबाबत भीती व्यक्त केली होती. याशिवाय इमारतीच्या सुरक्षा रक्षकासोबतही ताराबेन यांचा खटका उडाला होता. पोलिसांनी सुरक्षा रक्षकासह मोलकरीण व पेंटरचीही चौकशी केली आहे. याशिवाय मुलुंड व मालाड येथे राहणाऱ्या ताराबेन यांच्या दोन्ही मुलांकडेही या प्रकाराबाबत पोलिसांनी विचारणा केल्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश नलावडे यांनी सांगितले.


(sakal,14 april)

No comments: