Tuesday, April 7, 2009

38 हजार 442 परवानाधारक शस्त्रे जप्त

गैरवापर टाळण्यासाठी ः मुंबईतून 213 शस्त्रे जमा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील विविध पक्षांच्या राजकीय व्यक्तींकडून 38 हजार 442 परवानाधारक शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यात आली आहेत. ऐन निवडणुकीत राजकीय व्यक्तींकडे असलेल्या शस्त्रांचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ नये याची खबरदारी घेत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यातील पोलिस आयुक्तालये आणि जिल्हा अधीक्षक कार्यालयांमार्फत ही शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. मुंबईतून या काळात 213 परवानाधारक शस्त्रे जमा करण्यात आल्याची माहिती गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या तसेच यापूर्वीच्या निवडणुकांच्या वेळी गुन्हे दाखल असलेल्या राजकीय व्यक्ती अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडील शस्त्रे गोळा केली जातात. 2 मार्चला निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरात राजकीय व्यक्तींकडे असलेली परवानाधारक रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुले अशी शस्त्रे जमा करण्याच्या कामाला वेग आला. राज्यातील 10 पोलिस आयुक्तालये आणि 33 जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांतून त्यांच्या हद्दीत राहणाऱ्या व परवानाधारक शस्त्रे बाळगणाऱ्या राजकीय व्यक्तींना रितसर नोटिसा काढून त्यांची शस्त्रे जमा करण्यास सुरुवात झाली. त्यानुसार 4 एप्रिलपर्यंत राज्यभरात 38 हजार 442 परवानाधारक; तर 311 बेकायदा वापरण्यात येणारी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. राज्यभरात दिवसाला सरासरी एक हजारपेक्षा अधिक परवानाधारक शस्त्रे गोळा करण्यात येत असल्याची माहिती गृहखात्यातील अधिकाऱ्याने दिली. कोणत्याही प्रकारच्या परवान्याशिवाय वापरली जाणारी शस्त्रे जप्त करण्यावर पोलिसांचा भर आहे. मुंबईत 31 मार्चअखेर 186 परवानाधारक शस्त्र जमा करण्यात आली. हा आकडा आता 300 पेक्षा जास्त झाला आहे. मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदा वापरली जाणारी 16 रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुले; तर 70 हून अधिक अन्य शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. निवडणूक उमेदवारीचे अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यापूर्वी ही परवानाधारक शस्त्रे पोलिसांकडे जमा करायला लागत असल्याने गेल्या काही दिवसांत शस्त्रे गोळा करण्याच्या कारवाईला वेग आल्याचेही हा अधिकारी म्हणाला. राज्यभरात 4 एप्रिलपर्यंत निवडणुकीशी संबंधित अनुचित प्रकार, राजकीय वैमनस्यातून घडणाऱ्या 39 घटनांची गृहखात्याकडे नोंद झाली आह
े. यात मुंबई, कोल्हापूर, परभणी, जळगाव, बीड, नाशिक, औरंगाबाद, पुणे शहर, वर्धा आणि नागपूर येथील घटनांचा समावेश आहे. या घटनांमध्ये 46 जण जखमी झाल्याची नोंद असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.

(sakal,4 april)

No comments: