Tuesday, April 7, 2009

पोलिसांच्या ताफ्यात स्फोटके शोधणारे वाहन दाखल

एक्‍सप्लोसिव्ह स्कॅनर व्हॅन ः 200 मीटरच्या परिघावर नजर

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दोनशे मीटर परिसरातील स्फोटकांचा शोध घेऊ शकणाऱ्या अत्याधुनिक अशा "एक्‍सप्लोसिव्ह स्कॅनर व्हॅन' या स्फोटकांचा आणि शस्त्रास्त्रांचा शोध घेणाऱ्या वाहनाचा समावेश करण्यात आला आहे. सहा कोटी रुपये किंमत असलेले हे वाहन येत्या 6 एप्रिलपासून मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्यावरील खटल्याच्या सुनावणीच्या वेळी ऑर्थर रोड कारागृहाबाहेर उभे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मर्सिडीज कंपनीने बनविलेले हे वाहन अतिशय घातक अशी स्फोटके आणि शस्त्रास्त्रेच नव्हे तर दोनशे मीटरच्या परिसरात उभ्या असलेल्या व्यक्तिंच्या खिशातील नाण्यांची माहितीही उपलब्ध करून देणार आहे. या वाहनाला असलेल्या दोन्ही बाजूंच्या विशेष खिडक्‍यांना लावलेले कॅमेरे 360 अंशात फिरून सभोवतालची प्रत्येक हालचाल टिपतात. दोन दिवसांपूर्वी मुंबई बंदरात दाखल झालेल्या या वाहनातील स्फोटके आणि मेटल शोधणारी उपकरणे जर्मनी आणि अमेरिकेतून बसविण्यात आली आहेत. सौदी अरेबिया येथून जर्मनी नंतर अमेरिका आणि पुढे मुंबई असा या वाहनाचा आतापर्यंत प्रवास झाला आहे. दोनशे मीटरच्या परिघातील घातक स्फोटके आणि शस्त्रसाठा शोध घेण्याची क्षमता असलेल्या या वाहनाला अतिरेकी कसाबच्या सुरक्षिततेसाठीच प्रामुख्याने वापरले जाणार आहे. खटल्याच्या वेळी ऑर्थर रोड कारागृहाजवळ कोणत्याही प्रकारची घातपाती कारवाई होऊ नये, याकरिता सुनावणीच्या वेळी हे वाहन कारागृहाजवळच उभे करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस दलातील सूत्रांनी दिली. दोनशे मीटर क्षेत्रात शस्त्रास्त्र शोधण्याची क्षमता असलेले हे देशातील पहिलेच वाहन ठरणार आहे.

(sakal,2april)

No comments: