Tuesday, April 7, 2009

खंडणी मागणाऱ्या तीन पोलिसांचा शोध सुरू

कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार आज जोगेश्‍वरी येथील आंबोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करून एका इमिग्रेशन क्‍लिअरन्स एजन्सीच्या कार्यालयात 50 हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तीन पोलिस शिपायांसह चौघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला आंबोली पोलिसांनी अटक केली असून फरार असलेल्या तिघा पोलिस शिपायांचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलाश घमंडे यांनी दिली.

जोगेश्‍वरी पश्‍चिमेला असलेल्या ऍक्‍सिस इमिग्रेशन ऍण्ड क्‍लिअरिंग कंपनीच्या कार्यालयात काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कार्यालयात शिरलेल्या चौघांनी तेथील अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेतून आल्याचे सांगून एजन्सीच्या कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रे पडताळल्यानंतर एजन्सीच अनधिकृत असल्याचे सांगितले. हे प्रकरण मिटविण्याकरिता चौघांनी एजन्सीच्या अधिकाऱ्यांकडून 50 हजार रुपयांची मागणी केली. या वेळी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पोलिस नियंत्रण कक्षात दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानुसार आंबोली पोलिसांची गाडी काही क्षणांतच या ठिकाणी पोचली. पोलिस आल्याचे पाहून तेथे असलेले तीन पोलिस शिपाई तेथून पळून गेले; मात्र त्यांच्यासोबत असलेला राजू कृष्णा शेट्टी (34) याला पोलिसांनी जागेवरच पकडले. राजू शेट्टी याच्या चौकशीत त्याच्यासोबत स्थानिक शस्त्र शाखेत काम करणारे दोघे आणि बॉम्बशोधक व विनाशक पथकात काम करणारा एक असे तिघेही पोलिस होते, अशी माहिती उघडकीस आली आहे. या तिघांपैकी दोघांची नावे शिंदे आणि इस्माइल पिरजादे अशी असल्याचे आंबोली पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीतून पोलिसांची नावे उघडकीस आली असून त्यांना पकडल्यानंतरच ते पोलिस असल्याबद्दलची सत्यता उघडकीस येऊ शकेल, असेही आंबोली पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत अधिक तपास सुरू असून पोलिस आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक घमंडे यांनी दिली.

(sakal,4 april)

No comments: