Tuesday, April 7, 2009

"धूम' स्टाईल बाईक चालविणाऱ्यांना तुरुंगाची हवा

27 तरुणांना अटक ः सी लिंक परिसरात रात्रीच्या वेळी शर्यती

वांद्रे-वरळी सी लिंक परिसरात रात्रीच्या वेळी मोटरसायकलच्या रेस लावून "धूम' स्टाईलने गाड्या चालविणाऱ्या 27 बाइकर्सना तुरुंगाची हवा खावी लागली. वांद्रे पोलिसांनी काल मध्यरात्री अटक केलेल्या या दुचाकीस्वारांची आज न्यायालयाने प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.
वांद्रे-वरळी सी लिंक परिसरातील रस्त्यावर दर शनिवार, रविवारी मोटरसायकलींच्या शर्यती सुरू असतात. रात्री साडेनऊ ते मध्यरात्री उशिरापर्यंत 20 ते 30 वर्षे वयोगटातील गट या शर्यती लावून तुफान वेगात गाड्या चालवीत असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार या परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी खेरवाडीकडून येणाऱ्या उड्डाणपुलाखालील रस्त्यावर नाकाबंदी लावली. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास पल्सर, हिरो होंडासारख्या मोटरसायकल वाऱ्याच्या वेगाने चालवून शर्यती लावणारे हे 27 तरुण तेथे आले. या तरुणांना सुरुवातीला पोलिसांनी थांबवून गाड्या हळू चालविण्यास सांगितले; मात्र पोलिसांकडून सुटका होताच त्यांनी पुन्हा आपली शर्यत सुरू केली. यानंतर पोलिसांनी या तरुणांच्या मोटरसायकलींचा पाठलाग करून त्यांना पकडले. कुर्ला, अंधेरी, बोरिवली, धारावी परिसरात राहणाऱ्या या सर्वच तरुणांना पोलिसांनी अटक करून, त्यांच्या मोटरसायकलीही जप्त केल्या. रात्रीच्या वेळी मोकळ्या असणाऱ्या या मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून हा गट मोटरसायकलींच्या शर्यती लावत होता. त्यामुळे या रस्त्यावरून जाणारे अन्य वाहनचालक व पादचारी, तसेच या तरुणांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती या प्रकरणाचे तपासाधिकारी पोलिस उपनिरीक्षक अनिल मुळे यांनी दिली. यापूर्वीही याच मार्गावर शर्यती लावणाऱ्या चार गटांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली होती.
काल अटक केलेल्या या दुचाकीस्वारांत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, खासगी कंपन्यांत चांगल्या पदावर कामाला असणाऱ्यांचा समावेश असल्याचेही वांद्रे पोलिसांनी सांगितले.

(sakal,31march)

No comments: