Wednesday, April 15, 2009

गृहराज्यमंत्र्यांनी केली सुरक्षेची पाहणी

कसाब खटला ः ऑर्थर रोड परिसरात वाहतुकीवर निर्बंध

मुंबई हल्ल्याबाबत उद्यापासून सुरू होणाऱ्या खटल्याच्या पार्श्‍वभूमीवर ऑर्थर रोड कारागृहाबाहेर करण्यात आलेल्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची गृहराज्यमंत्री नसीम खान यांनी आज पाहणी केली. याप्रकरणी अटकेत असलेला एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑर्थर रोड कारागृहातच तयार करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात हा खटला चालणार आहे. शहर वाहतूक पोलिसांनीही खटल्याच्या वेळी परिसरातील वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत.
संपूर्ण प्रकरणाच्या संवेदनशीलतेचा विचार करता मुंबई हल्ल्याप्रकरणीचा खटला लवकरात लवकर निकालात काढून अतिरेकी कसाबला कठोर शिक्षा मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या खटल्यासाठी सरकार सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करीत असल्याचेही गृहराज्यमंत्री खान यांनी कारागृहाच्या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. हा खटला चालविण्यासाठी सरकारने नियुक्त केलेले विशेष न्यायमूर्ती एम. एल. ताहिलियानी यांना आणि कसाबचे वकीलपत्र घेणाऱ्या ऍड. अंजली वाघमारे यांना "झेड' दर्जाची, तर सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांना "झेड प्लस' दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
मुंबई हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर ऑर्थर रोड कारागृहात कडेकोट बंदोबस्त ठेवला जात असतानाच शहर वाहतूक पोलिसांनी या खटल्याच्या वेळी विशेष दक्षता म्हणून या परिसरातील वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. ऑर्थर रोड कारागृहाच्या परिसरात असलेला साने गुरुजी मार्ग, जे. आर. बोरीचा मार्ग, ना. म. जोशी मार्ग, केशवराव खाड्ये मार्ग आणि सातरस्ता सर्कल (संत गाडगे महाराज चौक) या रस्त्यांवर न्यायालयीन कामकाज सुरू असेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शहाजी सोळुंके यांनी दिली.

24 तास "नो-पार्किंग'
- साने गुरुजी मार्गावर संत गाडगे महाराज चौक ते चिंचपोकळी जंक्‍शनदरम्यान उत्तर व दक्षिण वाहिन्यांवर वाहनांना प्रवेश बंद.
- ना. म. जोशी मार्ग-चिंचपोकळी जंक्‍शन ते घोडके चौक बी. जे. रोडपर्यंत
- केशवराव खाडे मार्ग-संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता सर्कल) ते एस. ब्रीज जंक्‍शन उत्तर व दक्षिण वाहिनी.

खालील मार्गांवर वाहनांना प्रवेश बंदी
- सानेगुरुजी मार्ग-चिंचपोकळी जंक्‍शन ते संत गाडगे महाराज चौक दक्षिण वाहिनी. (दक्षिण वाहिनीवरून संत गाडगे महाराज चौककडून उत्तर वाहिनीवरील वाहतूक दक्षिणेवरून सोडण्यात येणार आहे)
- जे. आर. बोरीचा मार्ग-साने गुरुजी मार्गावरील कस्तुरबा रुग्णालय जंक्‍शन ते गंगाराम सकपाळ मार्ग जंक्‍शनपर्यंतची उत्तर व दक्षिण वाहिनी.
- केशवराव खाड्ये मार्ग-संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता सर्कल) ते एस. ब्रीज जंक्‍शनपर्यंत.

(sakal,14 april)

No comments: