Wednesday, April 15, 2009

बेस्टचालकाला मारहाण करून कारचालकाचा हवेत गोळीबार

चेंबूर हादरले ः ओव्हरटेक करण्याचा हव्यास

ओव्हरटेक करण्याच्या हव्यासापायी एका कारचालकाने बेस्ट बसचालकाला मारहाण करून भर रस्त्यावर हवेत गोळीबार केल्याची घटना आज सकाळी चेंबूरच्या आर. के. स्टुडिओजवळ घडली. या घटनेनंतर चेंबूर परिसरात काही काळ घबराट पसरली. गोळीबारानंतर पळून गेलेल्या कारचालकाला रात्री ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शीव-पनवेल महामार्गावर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेमुळे चेंबूर परिसरात एकच खळबळ उडाली. कळंबोली ते राणी लक्ष्मीबाई चौकादरम्यान धावणाऱ्या 505 क्रमांकाच्या बेस्ट बसमागून हा कारचालक मारुती कार घेऊन जात होता. तो घाईत असल्याने बेस्टला ओव्हरटेक करण्यासाठी त्याने बराचवेळ हॉर्न वाजविला. परंतु बेस्ट बसचालकाने त्याला दाद दिली नाही. त्यामुळे चिडलेल्या कारचालकाने संधी मिळताच चेंबूरच्या आर. के. स्टुडिओजवळ बेस्ट बससमोर आपली कार उभी केली. यानंतर बसचालक शहाबुद्दीन दाऊद पठाण (41) याला बसमधून खाली खेचून बेदम मारहाण केली. पठाण याला मारहाण करताना कोणी मध्ये पडू नये तसेच स्वतःच्या निसटण्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी कारचालकाने त्याच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केला. या गोळीबारातून स्वतःचा जीव वाचविण्याकरिता भयभीत झालेल्या प्रवासी आणि नागरिकांनी पळापळ करायला सुरुवात केली. या गोंधळातच कारचालकाने पलायन केले. मात्र, आर. के. स्टुडिओसमोर बराच वेळ हा प्रकार सुरू असल्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना कारचा क्रमांक टिपता आला. त्यांनी कारचालकाने केलेल्या गोळीबाराची माहिती व कारचा क्रमांक पोलिसांना कळविला. काही क्षणातच या ठिकाणी आलेल्या पोलिसांनी पळून गेलेल्या कारचालकाला पकडण्यासाठी पथके पाठविली. कारच्याच क्रमांकावरून पोलिसांनी तिच्या मालकाचा पत्ता शोधून सायंकाळी उशिरा कारचालकाला ताब्यात घेतले. त्याला अटक करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

--------------

चेंबूर येथे गोळीबार करणाऱ्या कारचालकाचे नाव मयूर पियूषपाल सिंग (32, रा. वाशी) असे आहे. बॅलार्ड पिअर येथे शान मरिन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची शिपिंग कंपनी असलेला मयूर त्याचे वडील कॅप्टन पियूषपाल यांच्यासोबत ऑफिसला जात होता. या वेळी चेंबूरच्या आर. के. स्टुडिओसमोर त्याने हा गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना रात्री अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. डी. पाचुंदकर यांनी दिली.


(sakal,9 april)

No comments: