Tuesday, April 7, 2009

गोपनीय माहितीचे ब्रिफिंग थांबविण्याचे आदेश

निवडणूक बंदोबस्त ः पैसे, भेटवस्तूंच्या वाटपाला रोखण्यासाठी पथके

राज्यात तीन टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून या काळात मतांसाठी पैसे आणि भेटवस्तूंच्या होणाऱ्या वाटपाला आळा घालण्यासाठी राज्यभरात विशेष पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती निवडणुकीच्या कामकाजाची जबाबदारी असलेले राज्याचे पोलिस महासंचालक सुप्रकाश चक्रवर्ती यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. निवडणूक काळात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना राज्य गुप्तचर विभागाकडून दैनंदिन गोपनीय माहितीचे केले जाणारे ब्रिफिंग थांबविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यापुढे गुप्तचर खात्यातील अधिकारी मुख्य सचिव आणि गृहखात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दैनंदिन गोपनीय माहिती पुरविणार असल्याचेही चक्रवर्ती या वेळी म्हणाले.

निवडणूक काळात सत्ताधारी पक्षांतील मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना राज्य गुप्तचर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून राजकीय तसेच अन्य क्षेत्रांतील दैनंदिन गोपनीय माहितीचे ब्रिफिंग केले जाते. निवडणूक काळात या ब्रिफिंगचा फायदा सत्ताधारी पक्षाकडून घेतला जाण्याची शक्‍यता अधिक असते. निवडणुकीदरम्यान कोणत्याही पक्षाला सरकारी यंत्रणेचा गैरफायदा घेता येऊ नये, यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य गुप्तचर यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापुढे फक्त मुख्य सचिव आणि गृहखात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांना ही दैनंदिन गोपनीय माहिती कळवावी, असे आदेश आपण यापूर्वीच दिल्याचेही चक्रवर्ती यांनी या वेळी सांगितले.

राज्यात 16, 23 आणि 30 एप्रिल अशा तीन टप्प्यांत लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. तब्बल 82 हजार 300 मतदान केंद्रावर निर्भय आणि शांततेच्या वातावरणात निवडणुका व्हाव्यात, याकरिता चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिस शिपाई आणि एक गृहरक्षक दलाचा जवान ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील भागातील केंद्रांवर दोन पोलिस शिपाई व एक गृहरक्षक दलाचा जवान ठेवला जाणार आहे. धार्मिक दंगली झालेल्या मालेगाव, औरंगाबाद, धुळे, अकोला यांसारख्या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त मतदान केंद्राबाहेर कोणत्याही प्रकारचा जमाव जमू नये, यासाठी केंद्राबाहेरही राज्य राखीव पोलिस दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत. निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी केंद्र सरकारने राज्याला केंद्रीय अर्धसैनिक सुरक्षा दलाच्या 30 कंपनी देण्याचे निश्‍चित केले आहे.

निवडणुकीच्या काळात एका जिल्ह्यातील पोलिस दुसऱ्या जिल्ह्यात निवडणुकांच्या कामकाजासाठी मोठ्या संख्येने हलविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात विदर्भ, मराठवाडा या परिसरात होणाऱ्या निवडणुकांसाठी सहा हजार 700 अतिरिक्त पोलिस, दुसऱ्या टप्प्यात पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग, कोकण, पुणे अशा होणाऱ्या मतदानासाठी 15 हजार 900 पोलिस; तर मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 1500 पोलिस सुरक्षा व्यवस्थेसाठी दिले जाणार असल्याचे चक्रवर्ती म्हणाले. याच तीन टप्प्यांत गृहरक्षक दलाच्या जवानांचीही मदत घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 11 हजार 200 पुरुष आणि एक हजार 600 महिला, दुसऱ्या टप्प्यासाठी 15 हजार 850 पुरुष आणि 2300 महिला; तर तिसऱ्या टप्प्यासाठी चार हजार 100 पुरुष आणि 900 महिला गृहरक्षक दलाचे जवान ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

निवडणुकीत आपल्या बाजूने मतदान व्हावे, यासाठी उमेदवार अथवा त्यांचे कार्यकर्ते मतदारांना मोठी रक्कम आणि महागड्या भेटवस्तू देऊन भुलवत असतात. हे प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तसेच पोलिस आयुक्तालयात विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून असे गैरप्रकार करणाऱ्यांवर कोणताही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई करण्यात येईल, असेही चक्रवर्ती म्हणाले.
(sakal,2april)

No comments: