Tuesday, May 5, 2009

...आणि महासंचालकांनीही घेतला लक्ष्याचा वेध

पोलिसांचा सराव ः पोलिस दलाचा होतोय कायापालट

गोरेगावच्या राज्य राखीव पोलिस दलाच्या गट -8 चे मैदान. राज्याच्या पोलिस महासंचालकांसह काही प्रमुख वरिष्ठ पोलिस अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी एका खासगी बसला काही व्यक्तींनी ओलिस ठेवले होते. मुंबई पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीममधील कमांडो बसमधील प्रवाशांना "त्या' व्यक्तींच्या तावडीतून सोडविण्यासाठी अत्याधुनिक शस्त्र, तसेच तंत्रांचा वापर करीत होते. पाहता पाहता या ठिकाणी गोळीबाराचा आवाज होतो अन्‌ काही क्षणांतच पोलिस बसमधील प्रवाशांची सुखरूप मुक्तता करतात.

प्रसिद्धिमाध्यमांचे प्रतिनिधी, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हा सगळा चित्तथरारक प्रकार श्‍वास रोखून पाहत होते. पुढच्याच क्षणी या "ओलिस' प्रकरणाचे वास्तव स्पष्ट झाले. पोलिसांनीच आयोजित केलेल्या गोळीबार सरावातील प्रात्यक्षिकांचा तो एक भाग होता. अतिशय खऱ्याखुऱ्या वाटणाऱ्या या प्रसंगानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी क्विक रिस्पॉन्स टीमच्या कमांडोंची पाठ थोपटल्यानंतर पोलिसांचे मनोधैर्य वाढले.

मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पोलिसांना आपत्कालीन स्थितीत अतिरेक्‍यांशी मुकाबला करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून गोरेगावच्या शूटिंग रेंजवर विविध प्रात्यक्षिके, तसेच पोलिस अधिकाऱ्यांचा गोळीबार सराव आज झाला. राज्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क, मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर, विशेष शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील रामानंद यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झालेली प्रात्यक्षिके उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवीत होती. नक्षलग्रस्त भागात पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कामांचे प्रात्यक्षिकही या वेळी उपस्थितांना दाखविण्यात आले. पोलिसांकडे असलेल्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शनही या वेळी मांडण्यात आले होते. या वेळी पोलिस महासंचालकांसह उपस्थित असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केलेला गोळीबाराचा सराव उपस्थित असलेल्या उत्कृष्ट शूटरनाही तोंडात बोट घालायला लावणारा होता. 15 वर्षांनंतर हातात एके-47 घेऊन "बुल्स आय'ला टार्गेट करणाऱ्या विर्क यांच्या नेमबाजीने उपस्थितांची वाहवा मिळविली. त्यांनी फायर केलेल्या एका मॅगझिनमधील 17 गोळ्यांनी लक्ष्य भेदले होते.
या वेळी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी मुंबई हल्ल्यानंतर पोलिस सर्व प्रकारच्या अतिरेकी कारवायांना समर्थपणे तोंड देण्यासाठी सज्ज होत असल्याचे सांगितले. येत्या महिनाभरात पोलिस दलात अत्याधुनिक शस्त्रास्त्रे दाखल होत असून, पोलिसांना परदेशी प्रशिक्षकांमार्फत शस्त्रास्त्रे चालविण्याचे, तसेच आपत्कालीन स्थितीत परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही गफूर यांनी सांगितले.

( sakal, 17th april)

No comments: