Tuesday, December 2, 2008

तीन महिन्यांपूर्वीच दिली होती "ताज'ला हल्ल्याची कल्पना

"ताज'ला हल्ल्याची कल्पना
पोलिसांची माहिती ः सुरक्षेसाठी 22 सूचना केल्या होत्या

ज्ञानेश चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 2 ः जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या ऐतिहासिक हॉटेल ताजवर अतिरेकी हल्ला होण्याची आगाऊ कल्पना पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाला तीन महिन्यांपूर्वीच दिली होती. हा हल्ला रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंबंधीच्या 22 सूचना ताज व्यवस्थापनाला पोलिसांनी दिल्या होत्या; मात्र या सूचनांकडे ताज व्यवस्थापनाने पुरते दुर्लक्ष केल्याची माहिती समोर येत आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या या हॉटेल समूहाने सुरक्षिततेबाबत जागरूकता दाखविली असती, तर कदाचित हॉटेलवर 26 नोव्हेंबरला झालेला हल्ला टळला असता, अशी धक्कादायक माहिती पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने "सकाळ'ला दिली.
समुद्रमार्गे मुंबईत आलेल्या 10 अतिरेक्‍यांनी 26 नोव्हेंबरपासून सतत तीन दिवस मृत्यूचे थैमान घातले. या हल्ल्यात 14 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह 183 जण ठार; तर 300 हून अधिक जण जखमी झाले. दक्षिण मुंबईत असलेले ऐतिहासिक हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय आणि नरिमन हाऊस या तीन इमारती अतिरेकी हल्ल्याचे प्रामुख्याने लक्ष्य ठरल्या. 59 तासांच्या थरारक चकमकीनंतर हॉटेल ताज अतिरेक्‍यांच्या ताब्यातून मुक्त करीत असताना दोन पोलिस आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) एका कमांडोने प्राणांची आहुती दिली. अतिरेक्‍यांच्या या हल्ल्यात 105 वर्षांची परंपरा असलेल्या हॉटेल ताजचे 500 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले; मात्र हॉटेल ताजवर होणाऱ्या या अतिरेकी हल्ल्याची कल्पना पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाला 29 सप्टेंबरलाच दिली होती. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीवरून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी 30 सप्टेंबरला जगभरात प्रसिद्ध असलेल्या
ताज हॉटेल समूहाचे मुख्य सुरक्षा व्यवस्थापक महावीर सिंग कांग, तसेच व्यवस्थापक सुनील कडी, श्रीमती जेनेट यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर तब्बल सहा तास हॉटेलच्या सुरक्षेसंबंधी पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनासोबत पाहणी केली. या वेळी पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाला स्पष्ट शब्दांत हॉटेलवर अतिरेकी हल्ला करणार असून, मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि बॉम्बहल्ला होण्याची शक्‍यताही वर्तविली. हा प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाला तब्बल 22 लहान-मोठ्या सूचना केल्या. 26 नोव्हेंबरला ज्या प्रवेशद्वाराने अतिरेकी हॉटेलमध्ये शिरले, तो दरवाजा कायमस्वरूपी बंद करून, तेथे ग्रील लावण्याची सूचना पोलिसांनी केली. मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त हॉटेलमधील अन्य दरवाजे बंद केले जावेत. हॉटेलमध्ये पाकिस्तानी नागरिकांना राहू दिले जाऊ नये, असे सांगण्यात आले असतानाही गेल्या आठवड्यात हॉटेलमध्ये पाच पाकिस्तानी नागरिक राहून गेल्याचे हा अधिकारी म्हणाला. हॉटेलमध्ये थांबणाऱ्या कोणत्याही नागरिकाला इंटरनेट सुविधा व वायफाय तंत्रज्ञानाचा पुरवठा करू नये; तसेच हॉटेलमध्ये शस्त्रधारी पोलिस, श्‍वानपथक ठेवावे, आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी हॉटेलचा "ले-आऊट मॅप' दिला जावा असेही पोलिसांनी या वेळी सुचविले; मात्र पोलिसांच्या कोणत्याच सूचनेकडे ताज हॉटेल व्यवस्थापनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. उलट तेथे ठेवलेले शस्त्रधारी पोलिस आणि श्‍वान पथक हॉटेल व्यवस्थापनाने काढून टाकले होते. परिणामी 26 नोव्हेंबरला अतिरेक्‍यांनी या हॉटेलचा ताबा घेऊन तीन दिवस प्रचंड नरसंहार घडविल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

No comments: