Thursday, December 25, 2008

मुंबई पोलिसांना हॉंगकॉंग पोलिसांकडून धडे!

लढा दहशतवादाशी : अतिरेक्‍यांशी लढण्याचे प्रशिक्षण
ज्ञानेश चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 24 : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रांचे प्रशिक्षण; तसेच दहशतवाद्यांशी लढण्याचे अद्ययावत तंत्र अवगत नसल्याने मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. भविष्यात अशा प्रकारच्या परिस्थितीशी मुकाबला करता यावा याकरिता पोलिसांना अत्याधुनिक शस्त्र चालविण्यासोबत अतिरेक्‍यांशी लढाई करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हॉंगकॉंग पोलिस दलातील काही निवृत्त अधिकारी; तसेच प्रशिक्षक मुंबई पोलिसांना मदत करणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. अत्याधुनिक शस्त्रांच्या हाताळणीसह अत्युच्च दर्जाचे सैन्य प्रशिक्षण घेतलेल्या दहापैकी नऊ अतिरेक्‍यांना पोलिस, नौदल आणि राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) कमांडोंनी तब्बल 59 तास केलेल्या कारवाईनंतर यमसदनी धाडले, तर एका अतिरेक्‍याला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईच्या वेळी मुंबई पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रे चालविण्याचे; तसेच अतिरेकी हल्ल्यामुळे निर्माण होणारी स्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण नसल्याने त्यांची तारांबळ उडाली. मुंबई नेहमीच अतिरेक्‍यांच्या हिटलिस्टवर असल्याने भविष्यात अशी स्थिती उद्‌भवल्यास तेवढ्याच सक्षमतेने तोंड देण्यासाठी पोलिसांना सुसज्ज ठेवले जाणार आहे. अद्ययावत शस्त्रांसह युद्धस्थिती हाताळता यावी, अतिरेक्‍यांशी तेवढ्याच ताकदीने लढा देता यावा; तसेच अतिरेक्‍यांनी सामान्य नागरिकांना ओलिस ठेवल्यानंतर कोणते युद्धतंत्र वापरावे याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी मुंबईतील पोलिसांना हॉंगकॉंग पोलिसांची मदत मिळणार आहे. अतिरेक्‍यांशी लढण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले हॉंगकॉंग पोलिस दलातील निवृत्त अधिकारी व प्रशिक्षक येथील पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत येत आहेत. सुरुवातीच्या काळात 70 पोलिसांना हे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त गफूर यांनी दिली. सैन्य प्रशिक्षणासारख्याच असलेल्या या प्रशिक्षणामुळे सामान्य पोलिसांत दहशतवाद्यांशी तितक्‍याच ताकदीने मुकाबला करण्याची उमेद वाढणार आहे. यापूर्वी अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे यांनी पोलिसांना अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला होता, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.

No comments: