Sunday, December 28, 2008

मी, गेट वे ऑफ इंडिया!

- ज्ञानेश चव्हाण

मी गेट वे ऑफ इंडिया... भारताचं प्रवेशद्वार...! किती वर्षं झाली त्याला? पाऊणशे तर नक्कीच. तेव्हापासून या अरबी समुद्राचा खारा वारा पीत मी येथे स्तब्धस्थिर उभा आहे. नेमकं सांगायचं, तर 1911 च्या डिसेंबरमध्ये माझ्या उभारणीला सुरुवात झाली. निमित्त होतं इंग्लंडचे राजे पाचवे जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या मुंबई भेटीचं. तेव्हापासून आजतागायत किती तरी गोष्टी माझ्या नजरेसमोर घडल्या. ज्यांनी माझी उभारणी केली, त्या ब्रिटिशांचं साम्राज्य लयाला गेलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी आपले अखेरचे भाषण माझ्या याच वास्तूत उभं राहून केलं होतं. आजही आठवते आहे, की भारत स्वतंत्र झाला आहे, या घोषणेने माझ्या दगडी भिंतीही आनंदाने शिरशिरल्या होत्या. आज याच स्वतंत्र सार्वभौम भारतातील मुंबापुरीच्या अस्मितेचं मी प्रतीक बनलो आहे. मुंबई. सतत धडधडणारी उद्यमनगरी, अर्थनगरी, मायानगरी मुंबई. येथील कितीतरी घटनांचा मी मूक साक्षीदार आहे. माझ्या नजरेसमोरच तर ही नगरी आकाराला आली, मोठी झाली.
आणि म्हणूनच 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याने मी कधी नव्हे तो घायाळ झालो आहे, व्यथित झालो आहे. माझ्या डोळ्यांसमोर उभ्या असलेल्या हॉटेल ताजमध्ये त्या रात्री जे काही झाले ते न भूतो असेच होते. हॉटेलमध्ये शिरलेल्या अतिरेक्‍यांनी शेकडो नागरिकांना ओलीस धरून तब्बल तीन दिवस मृत्यूचे तांडव केले. खरे तर त्या रात्री त्या भ्याड हल्ल्याची सुरुवात येथूनच तर झाली. आताही त्याची याद मन सुन्न करून टाकते. ती रात्र तर मी कधीही विसरू शकणार नाही. एके 47 रायफलींचे, शक्तिशाली हातगोळ्यांचे आवाज
आजही कानात गुंजत आहेत. मी येथे असहाय उभा होतो आणि कानावर ते आवाज येत होते. अतिरेकी कारवायांच्या क्रूर बातम्या येत होत्या. पण त्याचबरोबर सीएसटी, कामा हॉस्पिटल, हॉटेल ओबेरॉय, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाऊस येथे भारतीय वीरांनी दाखविलेल्या बहादुुरीचे किस्सेही मला क्षणाक्षणाला कळत होते. याच ठिकाणी सामान्य नागरिकांसह पोलिस, नौदल आणि एनएसजीचे कमांडो धारातीर्थी पडल्याच्या बातम्या आल्यानंतर काही क्षण माझाही जीव कासावीस झाला होता. ताज हॉटेलमध्ये एनएसजीचा कमांडो मेजर उन्नीकृष्णन, राज्य राखीव पोलिस दलाचा जवान राहुल शिंदे यांनी दिलेले बलिदान तर माझ्या अगदी डोळ्यांसमोरचे. ओबेरॉय आणि नरिमन हाऊसमध्ये अतिरेक्‍यांशी सुरू असलेले युद्ध 28 नोव्हेंबरच्या रात्री संपले. मात्र मी साक्षीदार असलेल्या हॉटेल ताजचा अतिरेक्‍यांसोबतचा लढा संपायला 29 नोव्हेंबरची सकाळ उजाडली. 59 तासांच्या थरारक लढ्याचा प्रत्येक क्षण न क्षण माझ्या पहाडी काळजावर कोरला गेला आहे. या संपूर्ण कारवाईचे वृत्तांकन करण्यासाठी जगभरातील प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींनी माझ्याच समोर असलेल्या मोकळ्या जागेचा ताबा घेतला होता. प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यात साठवून ठेवण्याकरिता या प्रतिनिधींची चाललेली धडपड दिसत होतीच. भारताकडे वक्रदृष्टी दाखविणाऱ्या अतिरेक्‍यांना नेस्तनाबूत केल्याची घोषणा राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (एनएसजी) महासंचालक जे. के. दत्ता यांनी केल्यानंतर मला जरासे हायसे वाटले, अगदी तसाच सुटकेचा श्‍वास या वृत्तप्रतिनिधींनी त्यावेळी सोडला होता. माझा परिसर या ठिकाणी सदैव वास्तव्य असलेल्या कबुतरांमुळेदेखील तितकाच प्रसिद्ध. अतिरेकींविरोधी कारवाई सुरू असताना शांतीचे दूत समजली जाणारी ही कबुतरे दिसली ती अगदी शेवटच्याच दिवशी. यावरून या कबुतरांची सजगता मला अधिक भावली. या संपूर्ण
अतिरेकी कारवाईत झालेले नुकसान कधी भरून न येणारे असेच होते. 178 हून अधिक मुंबईकरांच्या प्राणाच्या आहुतीने मुंबईवरचा आजवरचा सर्वांत मोठा हल्ला संपुष्टात आला.
अतिरेकी हल्ल्यानंतर मुंबईसह सबंध देशात जनसामान्यांचा उसळलेला जनक्षोभ महिनाभरानंतर आजही आठवतो. माझ्यासमोर असलेल्या विस्तीर्ण मोकळ्या जागेत 3 डिसेंबरला जमलेल्या हजारोंच्या उत्स्फूर्त जनसमुदायाने केलेल्या सरकारविरोधी घोषणा, बलिदान करणाऱ्यांच्या स्मृती जागविण्यासाठी त्यांनी लावलेल्या मेणबत्त्या पाहिल्यानंतर कृतकृत्य झालो. मुंबईकरांनी त्यांच्या भावनांना अशा प्रकारे वाट मोकळी करून दिली होती. अतिरेक्‍यांनी टार्गेट केलेले हॉटेल ताज आणि ट्रायडन्ट नव्याने 21 डिसेंबरला सुरू झाल्यानंतर मला झालेला आनंद गगनात मावत नव्हता. अतिरेकी कारवायांना माझ्या भारतीयांनी दिलेले हेच खरे चोख उत्तर होते. दुर्दम्य आत्मविश्‍वास आणि पराकोटीची जिद्द असलेल्यांचा हा प्रांत. इथले लोक मूठभर अतिरेक्‍यांच्या आक्रमणाने घाबरले तरच नवल. हा मुंबईच्या मराठी मातीचा गुणधर्म म्हटल्यास वावगे ठरू नये. हा सबंध परिसर तसा परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण. आता या ठिकाणी येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्याही नेहमीप्रमाणेच वाढू लागली आहे. आज हॉटेल ट्रायडन्ट आणि हॉटेल ताजचा परिसर मला जणू येथे कधी काही झालेच नाही, असा नेहमीसारखाच दिसतोय. ही दोन्ही हॉटेल आता दिमाखात सुरू आहेत. ऐतिहासिक वारसा असलेल्या हॉटेल ताजच्या अंतर्भागात दहशतवाद्यांनी केलेल्या घातपाताच्या खाणाखुणा आहेतही. मात्र त्या पुसण्याचे आणि पुन्हा अशा खाणाखुणा मुंबईच्या कोणत्याही वास्तूवर पडणार नाहीत, याची काळजी घेण्याचा सुरू असलेला मुंबईकरांचा प्रयत्न पाहून मन सुखावते. मुंबई, बाई, हॅट्‌स ऑफ टु यू ऍण्ड युवर स्पिरिट!

No comments: