Tuesday, December 2, 2008

हेमंत करकरे, अशोक कामटे,विजय साळसकर- प्रोफाईल

हेमंत करकरे प्रोफाईल

- 1982 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी. राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुख पदावर कार्यरत होते. देशातील काही निवडक आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक . रॉ मध्ये अनेक वर्ष उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर 2007 मध्ये मुंबई पोलिस दलात परतलेले करकरे सह पोलिस आयुक्त ( प्रशासन ) या पदावर रुजू झाले. रॉ मधील अनेक वर्षांच्या कामाचा अनुभव आणि गुप्तहेरांचे देशव्यापी नेटवर्क असल्याने त्यांची राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकावर नियुक्ती करण्यात आली. मालेगाव बॉम्बस्फोटानंतर हिंदुत्ववादी संघटनांचा बॉम्बस्फोटांसारख्या कृत्यातील सहभाग उघडकीस आणणारा हा अधिकारी आज (बुधवारी) मध्यरात्री ताज हॉटेलमध्ये अतिरेक्‍यांसोबत लढताना धारातीर्थी पडला. राज्य पोलिस दलाचा चेहरा बदलून त्याचे आधुनिकीकरण करण्यात करकरे यांची कामगिरी मोलाची आहे.

----------------

अशोक कामटे - प्रोफाईल
-----------------------
कणखरपणाचा आदर्श
मुंबई पोलिस दलाच्या पूर्व प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पदावर कार्यरत असणारे अशोक कामटे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदावर उल्लेखनीय कामगिरी बजावल्यानंतर कामटे यांची जूनमध्येच मुंबई पोलिस दलात सहआयुक्त पदावर बदली झाली होती.
कामटे हे मूळचे जांभळी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील रहिवासी होते. 1989 मध्ये अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून भंडारा जिल्ह्यात रुजू झाले. त्यानंतर अधीक्षक म्हणून सांगली, कोल्हापूर व ठाणे (ग्रामीण) येथे काम केले होते. शांतता समिती प्रतिनिधी म्हणून दीड वर्ष बोस्निया येथे परदेशात होते. पुन्हा मुंबईत दहशतवाद व नक्षलवादविरोधी पथकात कार्यरत होते.
अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे यांनी गेल्या वर्षी खैरलांजी प्रकरणानंतर सोलापुरात उसळलेली दंगल आपल्या कुशल नेतृत्वाखाली आटोक्‍यात आणली होती. मराठवाड्यात बीड येथेही त्यांनी पोलिस अधीक्षकपदावर चांगले काम केले होते. ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणूनही कामटे यांचा कार्यकाळ चांगलाच गाजला. अत्यंत कठोर प्रशासनासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री. कामटे यांनी सोलापुरातील आपली कारकीर्द गाजविली. माजी आमदार रवी पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रात्री बारा वाजता फटाके उडविल्यानंतर श्री. कामटे यांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. या कारवाईने ते चांगले चर्चेत आले होते. सोलापुरात ते पोलिस आयुक्तपदावर गेल्या जूनपर्यंत काम करत होते. त्यानंतर ते प्रशिक्षणासाठी इटलीला गेले. त्यानंतर ते मुंबईत काम करत होते.
खेळाची आवड असलेले कामटे पॉवरलिफ्टर आणि बॉडी बिल्डर म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांच्या नावावर पॉवर लिफ्टिंगमधील तीन राष्ट्रीय विक्रमांची नोंद आहे. त्यांनी माणुसकीच्या भावनेतून मुंबईची पॉवरलिफ्टर दीपाली कुलकर्णी हिला गेल्या वर्षी आर्थिक साह्यही केले होते. 2006 मध्ये कामटे यांना राष्ट्रपती पुरस्कार देण्यात आला होता. अशोक कामटे यांची "पोलिस स्टॅबिलिटी युनिट' या पथकात जानेवारी 2008 पासून नियुक्ती झाली होती. ते इटली येथील प्रशिक्षण पथकात सामील झाले होते.

------------------

विजय साळसकर- प्रोफाईल

बेडर अधिकारी

मुंबईच्या गुन्हेगारी विश्‍वात "एन्काऊंटर स्पेशलिस्ट' म्हणून विजय साळसकर यांचा दबदबा होता. अमर नाईकसारख्या मुंबईत गुन्हेगारी जगताची दहशत निर्माण करणाऱ्यांना साळसकर यांनी चकमकीत ठार केले होते. या बेडर अधिकाऱ्याने आतापर्यंत 78 हून अधिक सराईत गुन्हेगारांचा खातमा केला. 1983 च्या बॅचचे पोलिस अधिकारी असलेले साळसकर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुख पदावर होते. मुंबई पोलिस दलात त्यांच्या 24 वर्षांच्या सेवेत त्यांनी अमर नाईक, साधू शेट्टी, जग्गू शेट्टी, कुंदन सिंग रावत, जहूर मसंदा, सदा पावले, विजय तांडेल यांच्यासारख्या सराईत गुन्हेगारांना यमसदनी धाडले. "मेट्रो' चित्रपटगृहाजवळ अतिरेक्‍यांशी मुकाबला करताना साळसकर धारातीर्थी पडले

No comments: