Tuesday, December 2, 2008

एफबीआय, स्कॉटलंड यार्डची पथके मुंबईत दाखल

हल्ल्याचा तपास : अतिरेक्‍यांबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 1 ः मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी अमेरिकन गुप्तचर यंत्रणा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) व स्कॉटलंड यार्ड पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. दरम्यान, मुंबईत दहशतवादी हल्ल्यासाठी आलेले अतिरेकी कराची येथून "अल-हुसैनी' जहाजातून गुजरातच्या पोरबंदरपर्यंत आले. मृत्यूनंतरही मोठ्या प्रमाणावर प्राणहानी व्हावी यासाठी अतिरेक्‍यांनी हॉटेल ताज आणि ओबेरॉय येथे कत्तली केल्यानंतर मृतदेहांखाली हातबॉम्ब पेरल्याची माहिती उघडकीस आल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.
26 नोव्हेंबर रोजी मुंबईत घडविलेल्या अतिरेकी हल्ल्यात 14 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह तब्बल 183 जणांनी प्राण गमावले; तर सुमारे 300 जण जखमी झाले. "लष्कर-ए-तैय्यबा'ने घडविलेल्या या मृत्यूच्या तांडवात 22 परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला असल्याने आता जगभरातील पोलिस या हल्ल्याच्या चौकशीसाठी मुंबईत येत आहेत. त्यानुसार "एफबीआय'चे पथक रात्री उशिरा मुंबईत दाखल झाले. या पथकाने आज राज्याचे पोलिस महासंचालक ए. एन. रॉय, पोलिस आयुक्त हसन गफूर, गुप्तचर विभागाचे आयुक्त डी. शिवानंदन, कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजीव दयाळ, दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त के. पी. रघुवंशी यांच्यासोबत एक बैठक घेतली. या बैठकीत पोलिस आणि एफबीआयच्या पथकांनी दहशतवाद्यांसंबंधी त्यांच्याकडे असलेल्या माहितीची देवाण-घेवाण केली. स्कॉटलंड यार्ड पोलिसांचे पथकही या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर या पथकांनी अतिरेक्‍यांच्या हल्ल्याचे प्रमुख लक्ष्य ठरलेल्या हॉटेल ताज, ओबेरॉय व नरिमन इमारतींना भेट दिली.
दरम्यान, पोलिसांनी अटक केलेला अतिरेकी अजमल कासाब याने कराची येथून "अल हुसैनी' जहाजातून अतिरेकी आल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पाकिस्तानी सागरी हद्द ओलांडल्यानंतर पोरबंदर येथून हे अतिरेकी "कुबेर' जहाजाने मुंबईच्या दिशेने आले. या जहाजात पोलिसांना मिळालेला सॅटेलाईट फोन आणि जीपीएस सिस्टीम तपासणीसाठी तज्ज्ञांकडे पाठविण्यात आली आहे. या अतिरेक्‍यांनी त्यांच्या मृत्यूनंतरही मोठ्या प्रमाणावर घातपात व्हावा यासाठी मृतदेहांखाली हातबॉम्ब पेरून ठेवले होते. हॉटेलमधील मृतदेह उचलताना ही बाब स्पष्ट झाल्याचे मारिया यांनी सांगितले. या हल्ल्याच्या वेळी अतिरेक्‍यांनी त्यांच्या मोबाईलवरून केलेल्या संभाषणाचीही चौकशी करण्यात येत आहे. अतिरेक्‍यांनी हॉटेल लिओपोल्ड आणि ताज या ठिकाणी आठ किलोचे दोन बॉम्ब ठेवले होते. या दोन्ही बॉम्बना डिटोनेटर्स बसविण्यात आले होते; मात्र पोलिसांनी हे बॉम्ब निकामी केल्याचे मारिया या वेळी म्हणाले.

No comments: