गुन्हे शाखा ः मुंबई अतिरेकी हल्ला प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 18 ः मुंबईवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना मुंबईची माहिती पुरविल्याच्या संशयावरून अटक केलेला अतिरेकी फहीम अन्सारी याच्याकडून या कटातील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वर्तविली आहे. मूळचा मुंबईतील गोरेगाव येथील राहणारा फहीम अन्सारी लष्कर-ए-तैय्यबाचा कडवा अतिरेकी म्हणून ओळखला जातो. रामपूर येथे सीआरपीएफ कॅम्पवर गोळीबार केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या हाती लागलेल्या फहीमने त्यावेळी मुंबईवर अतिरेकी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती पोलिसांना दिली होती.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या कस्टडीतून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या फहीम अन्सारी आणि सबाऊद्दीन अहमद यांना आज किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. 26 नोव्हेंबरला मुंबईवर अतिरेकी हल्ला करणाऱ्या लष्कर-ए- तैय्यबाच्या दहा अतिरेक्यांना मुंबईची इथ्यंभूत माहिती फहीम अन्सारीने करून दिल्याचा गुन्हे शाखेच्या पोलिसांचा कयास आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने 10 फेब्रुवारी रोजी त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून मुंबईतील प्रमुख ठिकाणांचे नकाशे, फोटो आणि व्हीडिओ क्लिप्स मिळाल्या होत्या. यात प्रमुख रस्ते, इमारती, हाजीअली, रेसकोर्स, महालक्ष्मी रेल्वेस्थानक, ब्रीचकॅन्डी, महालक्ष्मी मंदिर, अमेरिकन कौन्सुलेट, मुख्य न्यायाधीशांचे घर, राजभवन, जसलोक रुग्णालय, मंत्रालय, हॉटेल ताज, विधान भवन इमारत, गेटवे ऑफ इंडिया, सीएसटी रेल्वेस्थानक, पोलिस महासंचालक व आयुक्त कार्यालयाच्या इमारती, स्टॉक एक्स्चेंज यांचा समावेश होता. लष्कर-ए- तैय्यबासाठी काम करणाऱ्या फहीमने मुंबईशी संबंधित सर्व माहिती पाकिस्तानमध्ये बसणाऱ्या लष्करच्या कमांडरना पुरविल्याची शक्यता आहे. त्याच्या माहितीमुळेच मुंबईवर घातपाती हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना मुंबईत घातपात करणे सोपे झाल्याचा अंदाज आहे.
लष्कर-ए-तैय्यबाच्या दहा अतिरेक्यांनी कराची, मुरीदके, लाहोर येथील ज्या ठिकाणी जिहादी प्रशिक्षण घेतले त्याच ठिकाणी फहीम अन्सारी व त्याचा साथीदार सबाउद्दीन अहमद याचेही प्रशिक्षण झाले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात असतानाच फहीमने मुंबईवर अतिरेकी हल्ल्याचा कट रचल्याची कबुली दिली होती. पोलिसांनी त्याच्याकडून मुंबईसंबंधी असलेली महत्त्वपूर्ण माहितीही हस्तगत केली होती. मुंबई हल्ल्यासाठी त्याला लष्कर-ए-तैय्यबाच्या कमांडोंनी सबाऊद्दीनच्या संपर्कात राहण्यास सांगितले होते. तोच मुंबईवरील हल्ल्यासाठी शस्त्र आणि माणसांची जमवाजमव करणार होता, अशी माहिती फहीमच्या चौकशीत उघड झाल्याचे गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली.
No comments:
Post a Comment