पोलिसांची तारांबळ ः रक्तातील हिमोग्लोबिन कमी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 18 ः मुंबई हल्लाप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात असलेला दहशतवादी मोहम्मद अमजल कसाब याची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे. कसाबच्या रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर पोलिस कोठडीत जात असल्याचे गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली. त्याच्या आजारपणामुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांत मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
मुंबईवर 26 नोव्हेंबरला अतिरेकी हल्ला करणाऱ्या दहा दहशतवाद्यांपैकी मोहम्मद अजमल कसाब हा एकमेव अतिरेकी पोलिसांच्या हाती आला आहे. पोलिसांच्या अटकेत असलेला कसाब सध्या पोलिस आयुक्त कार्यालयातच असलेल्या गुन्हे शाखेच्या कोठडीत आहे. पोलिसांना कसाबकडून 26 नोव्हेंबरचा कट आणि लष्कर-ए-तैयबाबाबत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे. पाकिस्तानविरुद्ध आजवरचा सगळ्यात प्रबळ पुरावा म्हणून कसाबकडे पाहिले जात असल्याने त्याच्या सुरक्षिततेबाबत पोलिस कमालीचे दक्ष आहेत. कोठडीत त्याने आत्महत्येसारखा कोणताही अनुचित प्रकार करू नये, यासाठी त्याला उघडेच ठेवण्यात येते. गुन्हे शाखेचे पोलिस डोळ्यात तेल घालून चोवीस तास त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. अशातच कसाबच्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्याने त्याची प्रकृती बिघडली; त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हिमोग्लोबिन कमी होण्यासोबतच त्याला रक्ताच्या उलट्या झाल्याचेही सांगण्यात येते. डॉक्टरांच्या एका पथकाने कोठडीत जाऊन त्याची वैद्यकीय चाचणी केली असून त्याला पौष्टिक जेवण आणि विटामिन्सच्या गोळ्या देण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत. चांगल्या आहाराने त्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यास त्याला वेळप्रसंगी रुग्णालयातही दाखल करावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेविषयी अडचण निर्माण होणार असल्याने डॉक्टरांनी कोठडीतच त्याच्यावर उपचार करावेत, असेही सांगण्यात आल्याचे समजते. पोलिस कोठडीत कसाबची दर 24 तासांनी वैद्यकीय तपासणी केली जात असल्याची माहितीही गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली.
No comments:
Post a Comment