Sunday, December 7, 2008

सुरक्षा यंत्रणा व गुप्तचर खात्यांतील त्रुटी दूर करणार

गृहमंत्री चिदंबरम ः एफबीआयप्रमाणे केंद्रात इंटलिजन्सची स्थापना

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 5 ः मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर खात्यांत त्रुटी आणि समन्वयाचा अभाव असल्याचे समोर आले आहे. येत्या काळात या दोन्ही विभागांत कमालीच्या सुधारणा करण्यावर प्रामुख्याने भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले. हल्ल्यामागे असलेले अतिरेकी आणि त्यांच्या संघटनांविरुद्ध आमच्याकडे सबळ पुरावे असल्याचेही चिदंबरम यांनी या वेळी स्पष्ट केले. या अतिरेकी हल्ल्यानंतर अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या धर्तीवर केंद्रीय स्तरावर इंटेलिजन्स एजन्सीची स्थापना करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
देश हादरविणाऱ्या 26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी अतिरेक्‍यांनी टार्गेट केलेल्या मुंबईतील ठिकाणांची पाहणी केली. या वेळी पोलिस महासंचालक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर खात्यातील उणिवांवर भाष्य केले. दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. याच वेळी सामान्य नागरिकांनीही सरकारमागे ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. देशाच्या अखंडतेसाठी सगळ्यांनीच सामूहिक प्रयत्न करावेत. मुंबईवर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय आणि लष्कर ए तय्यबा असल्याची विचारणा केली असता तपास यंत्रणेचा अहवाल आल्यानंतरच योग्य तो निष्कर्ष काढता येईल. हा हल्ला अनेकांची स्वप्ननगरी असलेल्या मुंबईवर नाही, तर देशाच्या आत्म्यावर झालेला आहे. अतिरेक्‍यांनी देशाच्या आत्म्यालाच आव्हान दिले आहे. तपास यंत्रणा या हल्ल्याच्या मुळाशी जाऊन त्यांचा समूळ नायनाट करतील, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. हा हल्ला बाहेरून आलेल्या अतिरेक्‍यांनी घडविला आहे. हल्ल्यामागे असलेल्यांची नावे घेण्यापेक्षा त्यांच्याविरुद्ध असलेले पुरावे सादर केले जातील. त्यानंतरच हल्ल्याची खरी आणि पूर्ण कहाणी पुढे येईल, असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना म्हटले. हा हल्ला राज्य आणि केंद्र सरकारचा दहशतवादासोबत लढण्याबाबतचा दृष्टिकोन बदलण्यास कारणीभूत ठरेल, असेही ते या वेळी म्हणाले.
पोलिस, एनएसजी आणि मरीन कमांडोंनी सतत तीन दिवस अतिरेक्‍यांशी केलेल्या कडव्या प्रतिकाराची प्रशंसाही त्यांनी या वेळी केली. अतिरेकी हल्ल्यात बळी पडलेल्यांना 31 डिसेंबरपूर्वी सरकारकडून जाहीर झालेल्या मदतीचे वितरण करण्यासंबंधी गृहखात्याला सूचना करण्यात आल्या आहेत. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींना सरकारकडून पुरेपूर सहकार्य करण्यात येणार आहे. याशिवाय विमा कंपन्यांना जखमी व मृत व्यक्तींच्या विम्याचे परतावे तातडीने देण्याबाबत सांगण्यात आल्याचेही चिदंबरम या वेळी म्हणाले.
दरम्यान, सकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर चिदंबरम यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन जखमी व त्यांच्या नातेवाइकांची भेट घेतली. यानंतर अतिरेक्‍यांच्या हल्ल्यात लक्ष्य ठरलेल्या हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय व छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनसचीही त्यांनी पाहणी केली. तत्पूर्वी अतिरेक्‍यांशी मुकाबला करताना वीरमरण आलेले दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचीही चिदंबरम यांनी विचारपूस केली. त्यांच्यासोबत राज्याचे पोलिस महासंचालक ए. एन. रॉय, गृहसचिव चित्कला झुत्शी, पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्यासह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

----------------

सॉरी मुंबई..!

मुंबईने बरेच भोगले आहे. 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अनेक निष्पापांचे बळी गेले. आता आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. या संपूर्ण घटनाक्रमांनंतर या शहराची माफी मागण्याव्यतिरिक्त आपल्याकडे पर्याय नाही, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या शहराची "सॉरी मुंबई' असे म्हणत माफी मागितली.
----------

No comments: