Tuesday, December 2, 2008

एक अधुरा "एहसास'

ज्ञानेश चव्हाण / सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.27 ः तरुणांना व्यसनमुक्त करून चांगल्या मार्गाला लावण्याचे दहशतवादविरोधी पथकाचे सह पोलिस आयुक्त हेमंत करकरे यांचे स्वप्न. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात दहशतवाद्यांशी मुकाबला करताना ते धारातीर्थी पडले आणि "एहसास' प्रकल्पाच्या नावाने त्यांच्या मनात रुजलेले स्वप्न अखेर अधुरेच राहिले. मालेगाव बॉम्बस्फोटांचा तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पासाठी वेळ देणार असल्याचे त्यांनी यापूर्वी "सकाळ'शी बोलताना सांगितले होते.
दहशतवाद्यांशी लढताना दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांना वीरमरण आले.
मुंबईत अंमलीपदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त म्हणून काम करीत असताना त्यांनी 1996 मध्ये "जिज्ञासा' संस्थेच्या मदतीने अंमलीपदार्थांच्या विळख्यात नवी पिढी जाऊ नये याकरिता व्यसनमुक्तीसंबंधी लहान मुलांची कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. मुंबईच्या झोपडपट्टी परिसरातील 30 हजार मुलांना व्यसनमुक्तीचे प्रशिक्षण दिलेल्या या संस्थेने 2006 पर्यंत 3 लाख मुलांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोचविला आहे. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीवर युरोपला रॉ. मध्ये नेमणूक झाल्यानंतरही अंमलीपदार्थांचे आंतरराष्ट्रीय सिंडीकेट्‌स, जागतिक दहशतवादसारख्या विषयांवर त्यांनी काम केले.
मुंबईत प्रशासन विभागाचे सह पोलिस आयुक्त म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यांनी व्यसनाधीन मुलांसाठीचे काम पुन्हा सुरू केले. दहशतवादविरोधी पथकाच्या सह पोलिस आयुक्तपदावर काम करीत असताना काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने "एहसास' नावाचा प्रकल्प हाती घेण्याचा संकल्प सोडला होता. तरुणाईला व्यसनमुक्त करण्यासाठी जागतिक अंमलीपदार्थविरोधी दिनानिमित्त त्यांनी जाहीर केलेल्या या संकल्पाला प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, आरोग्यमंत्री विमल मुंदडा, जिज्ञासा संस्थेचे आनंद नाडकर्णी यांनी पाठिंबा दिला होता. नवी मुंबई व ठाणे येथील बॉम्बस्फोट, इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्‍यांना पकडण्याचे आव्हान आणि मालेगाव बॉम्बस्फोटांचा तपास या दहशतवादविरोधी पथकाच्या तपास कामात गुंतलेल्या करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोटांच्या तपासानंतर या प्रकल्पासाठी वेळ काढण्याचा "सकाळ'च्या प्रतिनिधीशी बोलताना निर्धार केला होता.

No comments: