Tuesday, December 2, 2008

सागरी मार्गावरील हलगर्जीच नडली

गुप्तचर यंत्रणांचा इशारा ः गस्ती नौकांची अनुपलब्धता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 27 ः सागरी मार्गाने अतिरेकी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी वारंवार दिल्यानंतरही या मार्गावरील नौकांच्या गस्तींबाबत पोलिसांनी दाखविलेल्या कमालीच्या हलगर्जीमुळेच दक्षिण मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला. सात महिन्यांपूर्वी गस्ती नौकांच्या अनुपलब्धतेमुळे सागरी किनारपट्टीला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. गस्त वाढविण्याबाबतची पोलिसांनीची उदासीनताच या हल्ल्याला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.
कुलाबा येथील समुद्र किनाऱ्यावरून मुंबईत शिरलेल्या दहाहून अधिक दहशतवाद्यांनी हॉटेल ताज आणि ओबेरॉय या पंचतारांकित हॉटेलसह ठिकठिकाणी दहशतवादी हल्ले केले. या हल्ल्यात सुमारे 110 जण ठार; तर 217 जण जखमी झाले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख सह पोलिस आयुक्त हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, एन्काऊंटर स्पेशलिस्ट पोलिस निरीक्षक विजय साळसकर यांच्यासह 14 पोलिसांना वीरमरण आले.
पोलिसांच्या बोटी नादुरुस्त
मुंबईच्या सागरी किनारपट्टीवर अतिरेकी हल्ल्याची शक्‍यता "सकाळ' मध्ये 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात वर्तविली होती. मुंबईच्या 114 किलोमीटर लांबीच्या सागरी किनारपट्टीच्या संरक्षणासाठी पोलिसांच्या बोटी नादुरुस्त असल्याचे, तसेच अनेकदा भाडेतत्वाच्या बोटी घेऊन गस्त घालावी लागत असल्याचे देखील या वृत्तात म्हटले होते. या वृत्ताची चर्चा झाल्यानंतरही सागरी गस्त वाढविण्याबाबत पोलिसांनी बोटचेपे धोरण अवलंबिले. पोलिसांना सागरी गस्तीसाठी केंद्र सरकारने देऊ केलेल्या हायस्पीड बोटी अद्याप मुंबई पोलिसांना मिळालेल्या नाहीत. याशिवाय विस्तीर्ण अशा मुंबईच्या सागरी किनारपट्टीसाठी अवघे एकच सागरी पोलिस ठाणे असल्याने येथील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर आज सागरी मार्गावर मोठ्या प्रमाणावर गस्त वाढविण्यात आली. पोलिस आणि नौदलाच्या संयुक्त कारवाईत अतिरेक्‍यांचे शस्त्रसाठ्याने भरलेले जहाज पकडल्याचा दावा करण्यात येत आहे. सागरी किनारपट्टीच्या सुरक्षिततेबाबत पोलिस आणि सरकारी यंत्रणांनी वेळीच लक्ष पुरविले असते; तर हा हल्ला रोखणे शक्‍य झाले असते, असेही आता सांगितले जात आहे.

"सकाळ'ने वर्तविली हल्ल्याची शक्‍यता
किंवा
"सकाळ'ने दिली होती धोक्‍याची सूचना
मुंबईच्या किनारपट्टीवर असलेल्या अपूर्ण सागरी गस्तीमुळे राजभवनसह, बॉम्बे हाय, कुलाबा येथील नौदल तळ, बीएआरसी, ओएनजीसी, जेएनपीटी, गेटवे ऑफ इंडिया यासारख्या संवेदनशील ठिकाणांवर सागरी मार्गाने अतिरेकी हल्ल्याची शक्‍यता "सकाळ' मध्ये 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात वर्तविली होती

No comments: