Friday, December 5, 2008

अतिरेक्‍यांकडे होते आठ किलो वजनाचे दहा बॉम्ब

राकेश मारिया : सात फुटले; तीन पोलिसांनी निकामी केले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 4 ः सागरी मार्गाने मुंबईत आलेल्या दहा अतिरेक्‍यांकडे शस्त्रसाठ्यासह प्रत्येकी आठ किलो वजनाचे दहा बॉम्ब होते. त्यातील सात ठिकाणी ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला; तर तीन ठिकाणचे बॉम्ब पोलिसांनी निकामी केले. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे काल सापडलेला बॉम्ब अजमलच्या साथीदाराने ठेवल्याचे उघडकीस आल्याचे गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले. दरम्यान, पोरबंदरच्या समुद्रातून 21 नोव्हेंबरला कुबेर जहाज अचानक नाहीसे झाल्याचे त्याच्या मालकाने आज झालेल्या चौकशीत सांगितले .
मुंबईत 26 नोव्हेंबरला शिरलेल्या दहा अतिरेक्‍यांनी सतत तीन दिवस विध्वंस घडविला. अतिरेक्‍यांनी आणलेल्या दहापैकी दोन बॉम्ब टॅक्‍सींमध्ये ठेवण्यात आले होते, ज्यांचे स्फोट विलेपार्ले व वाडीबंदर येथे झाले. या स्फोटांनंतर महम्मद उमर अब्दुल खालीद आणि प्रेमचंद भीम या दोन्ही टॅक्‍सीचालकांचे मृतदेह टॅक्‍सीपासून शंभर ते दीडशे मीटरहून अधिक लांब उडाले, एवढी या बॉम्बची तीव्रता होती. अतिरेक्‍यांनी हॉटेल ताजचा ताबा घेतल्यानंतर ताजच्या घुमटात एका बॉम्बचा स्फोट घडविला. हॉटेल ओबेरॉयच्या आत व बाहेर ठेवलेल्या दोन्ही बॉम्बचे स्फोट झाले; तर नरिमन हाऊसचा तळमजला आणि चौथ्या मजल्यावर पोलिस तसेच एनएसजीच्या कमांडोंना रोखण्यासाठी ठेवलेले अन्य दोन बॉम्बही फुटले. हॉटेल ताजचे प्रवेशद्वार आणि लिओपोल्डच्या वळणावर असलेल्या गोकुळ हॉटेलजवळ सापडलेले प्रत्येकी आठ किलोचे दोन बॉम्ब निकामी करण्यात आले. आठवडाभरानंतर काल छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे सापडलेला बॉम्ब महम्मद अजमल याचा साथीदार इस्माईल खान याने ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर अतिरेकी हल्ल्यासाठी आल्यानंतर महम्मद अजमल कसाब येथील प्रसाधनगृहात गेला होता. या वेळी त्याचा साथीदार इस्माईल खान याने रेल्वेस्थानकात बॉम्ब असलेली पिशवी ठेवल्याची माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. या प्रत्येक बॉम्बला इलेक्‍ट्रॉनिक टायमर आणि डिटोनेटर लावलेले होते. फॉरेन्सिक सायन्स लॅबचा अहवाल आल्यानंतरच स्फोटकांच्या या साठ्यात झालेला आरडीएक्‍सचा वापर स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, अतिरेक्‍यांनी पोरबंदर येथून अपहरण केलेल्या कुबेर या जहाजाचा मालक विनोद मसाणी याची चौकशी सुरू झाली आहे. 14 नोव्हेंबरला पोरबंदर येथून "एमव्ही- मॉं' आणि "कुबेर' ही जहाजे मासेमारीसाठी पाठविण्यात आली. 21 तारखेला पोरबंदरपासून 150 नॉटिकल मैलांवर असलेल्या जाखौर येथून कुबेरचे अपहरण झाल्याचेही मसाणी याने पोलिसांना सांगितले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी रामपूर येथून अटक केलेल्या फहीम अन्सारीने अतिरेक्‍यांना मुंबईची माहिती दिली का, याची चौकशी सुरू असल्याचेही मारिया यांनी सांगितले.
---------------------

अजमलने सांगितले लष्करच्या कमांडरचे नाव
गुन्हेगारी क्षेत्रात वळण्यासाठी महम्मद अजमल आणि त्याचे मित्र शस्त्र घेण्यासाठी फिरत होते. यानंतर ते लष्कर-ए-तैयबाच्या संपर्कात आले. लष्करचा कमांडर झाकिर उर रहमान नक्वी याने त्यांच्या धार्मिक भावना भडकावून चांगल्या प्रकारे ब्रेनवॉश करून त्यांना दहशती कृत्यांसाठी सज्ज केल्याची माहिती अजमलच्या चौकशीत पुढे आली आहे.

1 comment:

lion9 said...

आजुन ही आतंगवादी मुंबईत असण्याची शक्यता आहे,मुंबई मधे अनेक बांगलादेशी बांधकाम व्यवसायात कम करतात . सरकारने कठोर कारवाई करणे जरुरी आहे , मुबई मधे पर प्रातीयाचे लोंढे येतात ,त्यावर कोठलेच बंधन नाही. व ते भारतीय आहेत का ह्याचा ही पत्ता नसतो. राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली मुंबई व महाराष्ट्राचा हे राजकरणी कत्तलखाना करतील. मराठी माणसा सावध राहा.