Tuesday, December 30, 2008

वीस जिल्ह्यांतील पोलिसांच्या तुकड्या मुंबईत

थर्टी फर्स्ट ः कडेकोट बंदोबस्त; खासगी संस्थांचीही मदत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 29 ः मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर नववर्षाच्या पूर्वसंध्येला नागरिकांच्या उसळणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेत समाजकंटकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. थर्टी फर्स्टनिमित्त राज्य राखीव पोलिस दल, गृहरक्षक दल व खासगी संस्थांचे स्वयंसेवक यांच्यासह 20 जिल्ह्यांतील पोलिसांच्या तुकड्या मुंबई पोलिसांच्या मदतीकरिता येणार असल्याची माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी दिली. हा पोलिस बंदोबस्त मोहरमपर्यंत कायम ठेवण्यात येणार असल्याने या कालावधीत मुंबईला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे.
26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या घातपाती हल्ल्यांतून सावरलेला मुंबईकर थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला नववर्षाच्या स्वागतासाठी दर वर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याची शक्‍यता आहे. दर वर्षीचा अनुभव लक्षात घेता, यंदाही शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव, दादर, जुहू, मालाड, अक्‍सा बीच येथील समुद्रकिनारे, तसेच गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. 2006 आणि 2008 मध्ये नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला जमावाकडून तरुणींची छेडछाड करण्याच्या झालेल्या प्रकारानंतर गर्दीच्या ठिकाणी तरुणी, महिला व लहान मुलांकरिता विशेष व्यवस्था केली जाणार आहे. गर्दीचा गैरफायदा घेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी थेट गर्दीतच साध्या वेशातील पोलिस ठेवण्यात येणार आहेत. महिला आणि मुलींची छेड काढणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीमही या वेळी राबविण्यात येणार आहे.
समुद्रकिनारी फटाके फोडण्यासही बंदी घालण्यात आली असून, रात्री साडेबारा वाजेपर्यंतच सार्वजनिक ठिकाणी नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांना परवानगी देण्यात आल्याची माहिती प्रसाद यांनी यापुढे बोलताना दिली. पोलिसांच्या मदतीसाठी राज्य राखीव पोलिस दल, कमांडो पथक व शीघ्र कृती दल, गृहरक्षक दल व खासगी संस्थांचे स्वयंसेवक तैनात ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय राज्याचे पोलिस महासंचालक ए. एन. रॉय यांनी खास मुंबईच्या सुरक्षिततेसाठी 20 जिल्ह्यांतून पोलिस तुकड्या मागविल्याचेही त्यांनी सांगितले.
गेटवे ऑफ इंडियासारख्या ठिकाणी सायंकाळी नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता, सायंकाळनंतर खासगी बोटी, क्रूझ व जहाजाने समुद्रात पार्ट्यांसाठी जाणाऱ्यांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. शहरात ठिकठिकाणी क्‍लोजसर्किट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. समुद्रकिनारे, तसेच गर्दीच्या ठिकाणी असलेला वीजपुरवठा रात्रभर सुरू ठेवण्यासंबंधी मुंबई महापालिकेला विनंती करण्यात आली आहे. नागरिकांनीदेखील गर्दीच्या ठिकाणी फिरताना आपले कान आणि डोळे उघडे ठेवून, प्रत्येक संशयास्पद व्यक्ती व हालचालींची माहिती पोलिसांना वेळीच द्यावी; जेणेकरून पोलिसांना तातडीने कारवाई करणे शक्‍य होईल, असे आवाहनही प्रसाद यांनी केले.

No comments: