Tuesday, December 2, 2008

अतिरेक्‍यांना ताज व ओबेरॉयची खडानखडा माहिती होती

तपासातील माहिती ः तीन महिने प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.28 ः मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी "डेक्कन मुजाहिदीन' या कथित अतिरेकी संघटनेने घेतली असली तरी हल्लेखोर अतिरेकी लष्कर ए तैय्यबाशी संबंधित असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. या अतिरेक्‍यांना घातपाती हल्ल्यासाठी लष्कर-ए-तैय्यबाने कराचीत तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले. अतिरेकी हल्ल्याचे मुख्य टार्गेट ठरलेल्या हॉटेल ताज आणि ओबेरॉयमध्ये शिरण्याचे व बाहेर पडण्याचे सर्व प्रमुख मार्ग माहीत होते, अशी माहितीही पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस येऊ लागली आहे.
समुद्रमार्गाने मुंबईत शिरलेल्या लष्कर ए तैय्यबाच्या अतिरेक्‍यांनी तब्बल दोन दिवस केलेल्या दहशती कारवायांनी देशाला हादरवून सोडले. मुंबईचे प्रतीक समजली जाणारी ताज आणि ओबेरॉय ही दोन पंचतारांकित हॉटेल्स आणि कुलाबा येथील यहुदींचे वास्तव्य असलेली नरिमन इमारत अतिरेक्‍यांच्या हल्ल्याचे प्रमुख केंद्र ठरली. देशावर झालेला आजवरचा सर्वांत मोठा अतिरेकी हल्ला म्हणून पाहिले जाणाऱ्या या हल्ल्याची पूर्वतयारी पाच महिन्यांपासून सुरू होती. हल्ल्यात सहभागी झालेल्या अतिरेक्‍यांना लष्कराच्या कमांडोंनी तीन महिने शस्त्र प्रशिक्षण दिले. यात विशेषतः एके -47 सारखी शस्त्रे चालविण्याच्या प्रशिक्षणाचाही समावेश असल्याचे तपासात उघडकीस येऊ लागले आहे. पाकिस्तानातून मोठ्या जहाजाने अतिरेक्‍यांचा गट मुंबईत आला. मुंबईत येण्यासाठी त्यांनी लहान नौका वापरली. मुंबईच्या सागरी किनारपट्टीच्या जवळ येत असताना त्यांनी नौकेच्या मालकाला ठार मारले. मुंबईत उतरल्यानंतर प्रत्येकी दोन जणांचे गट तयार करून त्यांनी हा हल्ला चढविल्याचे सांगण्यात येते. मुंबईत ठिकठिकाणी गोळीबार करून हॉटेल ताज आणि ओबेरॉयमध्ये शिरलेल्या या अतिरेक्‍यांना हॉटेलमध्ये जाण्याचे तसेच बाहेर पडण्याचे सर्व प्रमुख मार्ग माहीत होते. याशिवाय त्यांच्याकडे हॉटेलच्या अतंर्भागाचे नकाशेदेखील उपलब्ध होते, अशीही माहिती पुढे आली आहे. अतिरेकी कारवाईच्या वेळी पोलिसांनी जखमी अवस्थेत अटक केलेल्या अतिरेक्‍याला उपचारासाठी नायर रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारानंतर पोलिसांनी त्याला गुप्त ठिकाणी हलविल्याचे सांगण्यात येते.त्याच्याकडूनच या हल्ल्यासंबंधीची माहिती उघडकीस होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
---------

No comments: