Tuesday, December 2, 2008

दबावाखाली येताच दहशतवादी आग लावतात

एनएसजीचे महासंचालक : कार्यपद्धती माहीत असल्याने कारवाई यशस्वी

ज्ञानेश चव्हाण : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 29 ः पकडले जाण्याच्या भीतीने दबावाखाली येऊन दहशतवादी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी आग लावायला सुरुवात करतात. "ऑपरेशन ताज'च्या वेळी सोबतचे दोन अतिरेकी मारले गेल्यानंतर जिवंत राहिलेल्या एका अतिरेक्‍यावर पकडले जाण्याच्या अथवा मरणाच्या भीतीने प्रचंड दबाव आला. तेव्हा त्याने तो जिथे होता त्या खोलीला आग लावून त्याच्या मागावर असलेल्या कमांडोजचे लक्ष भरकटविण्याचा प्रयत्न केला. अतिरेक्‍यांची ही कार्यपद्धती माहीत असल्याने कमांडोंनी आपल्या "लक्ष्या'वर गोळीबार सुरूच ठेवला. याच गोळीबारात तो अतिरेकी मरण पावल्याची माहिती राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (एनएसजी) महासंचालक ज्योती कृष्ण दत्ता यांनी दिली.

"ऑपरेशन ताज'च्या वेळी अतिरेक्‍यांनी हल्ल्याचे तंत्र वेळोवेळी बदलले. त्यामुळे कारवाई करण्यात थोड्याबहुत प्रमाणावर अडचणी आल्या. अतिरेक्‍यांनी अनेकदा त्यांची जागा बदलून गोळीबार केला. ताजमधील कारवाईत तीन अतिरेक्‍यांचा खातमा केला आहे. या ऑपरेशनमध्ये एनएसजीचे मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद झाले. हॉटेलमध्ये अतिरेक्‍यांच्या मागावर असताना उन्नीकृष्णन त्यांच्या सहकाऱ्यांपासून वेगळे झाले. या वेळी समोर आलेल्या अतिरेक्‍यांशी एकट्यानेच लढून त्यांनी बहाद्दुरी दाखविली.

...तर काय कराल?
एखाद्या हॉटेलमध्ये किंवा वसाहतीत दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यास तेथे असलेल्या पर्यटक अथवा नागरिकांनी घराच्या खिडक्‍या उघड्या ठेवाव्यात. जेणेकरून तो खरोखरच सामान्य नागरिक असल्याची खात्री पटू शकेल. एनएसजीच्या कमांडोंकडे असलेल्या अद्ययावत शस्त्राच्या सहाय्याने एखाद्या घरात लपलेल्या अतिरेक्‍याला खूप दूरवरून टिपण्याची क्षमता असते. याशिवाय लपलेल्या अतिरेक्‍याकडे असलेल्या हत्याराचीही माहिती कमांडर्सना घेता येते, असेही दत्ता या वेळी म्हणाले.

No comments: