Sunday, December 14, 2008

ठार झालेल्या अतिरेक्‍यांच्या डीएनए नमुन्यांचा अभ्यास

एफबीआयचा तपास ः अन्य कारवायांतील सहभागाचा शोध घेणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 14 ः मुंबईवर हल्ल्यात ठार झालेल्या नऊ अतिरेक्‍यांचा अफगाणिस्तान व अन्य ठिकाणच्या दहशतवादी कारवायांत सहभाग आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी एफबीआय आणि पाश्‍चिमात्य तपासयंत्रणांनी मृतदेहांचे डीएनएचे नमुने अभ्यासासाठी काढून घेतल्याचे वृत्त आहे. मुंबईवर हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटके अफगाणिस्तान येथील हल्ल्यांत वापरलेल्या स्फोटकांशी मिळतीजुळती असल्याचे सांगण्यात येते. मात्र याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले.

26 नोव्हेंबरला मुंबईवर हल्ला करणाऱ्या लष्कर-ए-तैयबाच्या दहा अतिरेक्‍यांपैकी नऊ जणांचा पोलिस आणि एनएसजी कमांडोंनी खातमा केला. या अतिरेक्‍यांच्या मृतदेहांवर पाकिस्तानने अद्याप दावा न केल्याने हे मृतदेह अद्याप जे.जे. रुग्णालयात पडून आहेत. या हल्ल्यात बावीस परदेशी नागरिक मारले गेल्याने या हल्ल्याच्या तपासासाठी एफबीआयसह परदेशातील तपास पथके मुंबईत आले आहेत. अफगाणिस्तान व अन्य देशातील घातपाती कारवायांत या अतिरेक्‍यांचा सहभाग नाकारता येत नाही. त्यामुळे एफबीआय आणि पश्‍चिमात्य देशांच्या तपासयंत्रणांनी या अतिरेक्‍यांच्या मृतदेहांचे डीएनए नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या तपासयंत्रणा त्यांच्याकडील डाटा बॅंकमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या डीएनए नमुन्यांशी मुंबई हल्ल्यात मारल्या गेलेल्या अतिरेक्‍यांचे डीएनए जुळवून पाहणार आहेत. या हल्ल्यामागे असलेल्या लष्कर-ए-तैयबाने दक्षिण अफगाणिस्तानमध्ये तालिबानी अतिरेक्‍यांनी घडविलेल्या दहशतवादी कारवायांना मदत करण्यासाठी देखील अतिरेकी पाठविले होते. त्या वेळी या अतिरेक्‍यांनी खोस्त येथे त्यांचे तळ उभारल्याचेही स्पष्ट झाले आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत मारले गेलेले अतिरेकी अथवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या अन्य कोणी तालिबानी दहशतवादी संघटनेसाठी काम करीत आहे का याचीही चाचपणी तपासयंत्रणा करणार आहेत.

अमेरिकेतील एफबीआय, लंडन येथील स्कॉटलंड यार्ड पोलिस यांच्यासह पश्‍चिमात्य देशांतील तपासयंत्रणा आणि त्यांचे फॉरेन्सिक सायन्स तज्ज्ञही मुंबई पोलिसांना तपासासाठी सहकार्य करीत आहेत. मुंबई हल्ल्यात वापरण्यात आलेली स्फोटके अफगाणिस्तान येथे तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या अतिरेकी कारवायांत वापरलेल्या स्फोटकांशी मिळतीजुळती असल्याचे समजते.
या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत तळ ठोकून असलेले एफबीआयचे पोलिस मुंबई हल्ल्यात अतिरेक्‍यांनी अमेरिकी नागरिकावर अत्याचार अथवा छळ करून त्यांचा खून केला आहे का, याचा देखील शोध घेत आहेत. अतिरेक्‍यांनी हल्ल्याच्या वेळी वापरलेल्या व्हीओआयपी फोनप्रकरणी एफबीआय अतिरेक्‍यांवर अमेरिकेतील कोड ऑफ इंटरनेट टेलिफोन या कायद्यानुसार गुन्हा दाखल करणार आहे. त्यासाठी त्यांनी पोलिसांनी पकडलेला एकमेव जिवंत अतिरेकी महम्मद अजमल कसाब याचा कबुलीजबाब मुंबई पोलिसांकडे मागितले आहे.

No comments: