Tuesday, December 2, 2008

अखेर 59 तासांनी सुटकेचा नि:श्‍वास

निकराचा लढा : हॉटेल ताज अतिरेक्‍यांच्या तावडीतून सोडविले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 29 ः हॉटेल ओबेरॉय आणि कुलाब्याचे नरिमन हाऊस काल (ता. 28) अतिरेक्‍यांच्या तावडीतून प्रयत्नांची शिकस्त करून सोडविणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा दलाला (एनएसजी) हॉटेल ताजवर पुन्हा कब्जा मिळविण्यासाठी मात्र प्रदीर्घ काळ संघर्ष करावा लागला. एनएसजीने मुंबई पोलिस, नौदल आणि लष्कराच्या मदतीने 59 तास निकराने दहशतवाद्यांशी लढा दिला. अखेर आज सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी हॉटेलमध्ये लपलेल्या तिघाही अतिरेक्‍यांचा खातमा केल्याचे एनएसजीने जाहीर केल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

आजवरचा सर्वांत मोठा अतिरेकी हल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या हल्ल्याने सबंध देश हादरला. 26 तारखेला रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात 195 जणांना जीव गमवावा लागला तर कित्येक जण जखमी झाले. एनएसजीच्या कमांडोंनी हॉटेल ओबेरॉय आणि नरिमन हाऊस दोन दिवसांच्या प्रयत्नांती काल सायंकाळी अतिरेक्‍यांच्या ताब्यातून मुक्त केले. यावेळी पर्यटक, विदेशी नागरिकांना ओलिस ठेवून लपून बसलेल्या या अतिरेक्‍यांच्या कारवाईला चोख उत्तर देताना एनएसजी कमांडोंनी पाच अतिरेक्‍यांना ठार मारले.
अतिरेक्‍यांनी हल्ल्याचे तंत्र बदलले
ऐतिहासिक वारसा असलेल्या हॉटेल ताजमध्ये लपलेल्या अतिरेक्‍यांना जेरीस आणण्याचे प्रयत्न मात्र एनएसजी, पोलिस आणि लष्कराला मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही सुरूच ठेवावे लागले होते. दोन दिवस दोन्ही बाजूंनी होणारा गोळीबार आणि हातबॉम्बचा हल्ला काल मध्यरात्रीनंतर काही वेळ थांबला. लपलेल्या अतिरेक्‍यांनी हल्ल्याचे तंत्र बदलल्याने एनएसजीच्या अधिकाऱ्यांनीदेखील आपला ऍक्‍शन प्लॅन बदलला. कमांडोंच्या पथकांनी ताजमधील सहाशेहून अधिक खोल्यांमधून अतिरेक्‍यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा लपलेल्या अतिरेक्‍यांनी गोळीबाराला सुरुवात केली. अतिरेक्‍यांनी आणखी काही पर्यटक, परदेशी नागरिकांना ओलिस ठेवल्याची शक्‍यता असल्याने कमांडो अतिशय काळजीपूर्वक हे "ऑपरेशन' हाताळत होते. हा गोळीबार व हातबॉम्बचा आवाज हॉटेलबाहेर सुमारे तीनशे मीटर लांब उभे राहून वृत्तांकन करणाऱ्या शेकडो प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या हृदयाचे ठोके चुकवत होता. एक-दोनदा तर अतिरेक्‍यांनी झाडलेल्या गोळ्या या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्याच दिशेने आल्या.

त्याच सुमारास पावसाच्या शिडकाव्यामुळे हॉटेलबाहेरच्या वातावरणातील तणाव काहीसा कमी होत नाही तोच एनएसजीच्या कमांडोंनी तळमजला व पहिल्या मजल्यावर लपलेल्या एका अतिरेक्‍यावर गोळीबार सुरू केला. कमांडोंच्या हाती सापडण्याच्या भितीने या अतिरेक्‍याने सात वाजून वीस मिनिटांनी हॉटेलच्या तळमजल्यावर हातबॉम्ब फोडून आग लावली. काही क्षणातच ही आग पहिल्या मजल्यावरही पसरली. ही आग विझविण्यात कमांडोंचा बराच वेळ जाईल या अंदाजाने तळमजल्यावर असलेला अतिरेकी हॉटेलमधीलच सुरक्षित ठिकाणी पळत असतानाच कमांडोंनी त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. काही क्षणातच त्याचा हॉटेलबाहेर पडलेला मृतदेह सगळ्यांनीच पाहिला. तत्पूर्वी तळमजला व पहिल्या मजल्यावर लागलेली आग आठ वाजता अग्निशमन दलाने मुंबई पोलिसांच्या संरक्षणात विझविली. दरम्यान, एनएसजी कमांडोंनी संपूर्ण हॉटेलमध्ये तपासणी केली. यानंतर एनएसजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हॉटेलमधील सगळ्या अतिरेक्‍यांचा निःपात केल्याचे जाहीर केले. सतत तीन दिवस सुरू असलेली ही कारवाई एनएसजीच्या कमांडोंनी मुंबई पोलिस, लष्कर, नौदल आणि शीघ्र कृती दलाच्या मदतीने यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे एनएसजीचे महासंचालक जे. के. दत्त यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले. मात्र हॉटेलमध्ये अद्याप बरेच काम उरल्याचेही त्यांनी सांगितले. तोवर या परिसराचे वैभव आणि शांततेचे प्रतीक असलेल्या कबुतरांनी गेटवे ऑफ इंडियाच्या मोकळ्या परिसरात नेहमीप्रमाणे जमायला सुरुवात केली. तब्बल 59 तासांनी दहशतवादी हल्ल्याचा बिमोड करण्यात सुरक्षा दलांना यश आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्‍वास सोडला!

No comments: