Wednesday, December 17, 2008

राज्यात "फोर्स वन' कमांडो पथक स्थापणार

सुरक्षा योजना ः गृहखात्यातील अधिकाऱ्याची माहिती

ज्ञानेश चव्हाण / सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 16 ः मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या घटना पुन्हा राज्यात घडू नयेत यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) च्या धर्तीवर "फोर्स वन' नावाचे सुरक्षा पथक स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती गृहखात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने "सकाळ'ला दिली.
26 नोव्हेंबरला मुंबईवर सागरी मार्गाने झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर गृहखात्याने राज्याच्या सुरक्षिततेसंबंधी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घ्यायला सुरुवात केली. या आढाव्यानंतर राज्य सरकारने अतिरेकी हल्ल्याला तोंड देण्यासाठी "फोर्स वन' हे कमांडो पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही मुंबईच्या सुरक्षिततेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत एनएसजीच्या धर्तीवर कमांडो पथक सुरू करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. लवकरच स्थापन होणाऱ्या या पथकात सुरुवातीच्या काळात 350 कमांडोंची नेमणूक केली जाणार असल्याचे हा अधिकारी म्हणाला.
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई नेहमीच अतिरेक्‍यांच्या हिटलिस्टवर आहे. यापूर्वीही मुंबईत घातपाती कारवाया झाल्या आहेत. अतिरेक्‍यांच्या या घातपाती कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अनेकदा समर्थ ठरत नाहीत. त्यामुळेच मुंबईसह राज्याच्या सुरक्षिततेसाठी स्थापन होणाऱ्या या पथकात पोलिसांसह प्रामुख्याने लष्कर, नौदल, सीआरपीएफ, सीआयएसएफ; तसेच शॉर्ट सर्व्हिस कमिशननुसार लष्करात दाखल होणाऱ्या जवानांचा समावेश केला जाणार आहे. या पथकाला एनएसजीच्या कमांडोंना देण्यात येणाऱ्या ट्रेनिंगसारखेच ट्रेनिंग दिले जाणार आहे. यात अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करण्यापासून अतिरेक्‍यांना नेस्तनाबूत करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. या पथकाचा तळ मुंबईत सांताक्रूझ येथील विमानतळानजीक ठेवण्यात येणार आहे. राज्यातील संवेदनशील ठिकाणी होणाऱ्या घातपाती कारवायांच्या वेळी हे पथक काही तासांतच घटनास्थळी पोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करणार असल्याचेही या अधिकाऱ्याने "सकाळ'ला सांगितले.
------------------------

No comments: