Monday, December 8, 2008

प्राण गेला तरी बेहत्तर, अतिरेक्‍यांना जिवंत सोडणार नाही

ताजवरील अतिरेकी हल्ला ः सीसीटीव्हीने टीपली पोलिसांची निकराची झुंज

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 7 ः "मला फोर्स आणि शस्त्रसाठा पाठवून द्या. मी या अतिरेक्‍यांना हॉटेलच्या बाहेर जिवंत जाऊ देणार नाही. अतिरेक्‍यांसोबत दोन हात करताना स्वतःचा प्राण गमवावा लागला तरी बेहत्तर..!' पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे पाटील त्यांचे "किंग सर' अर्थात पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्याशी वायरलेसवरून बोलत होते. 26 नाव्हेंबरला रात्री हॉटेल ताजमध्ये शिरलेल्या अतिरेक्‍यांसोबत विश्‍वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तब्बल आठ तास निकराचा लढा दिला. पोलिसांच्या कडव्या प्रत्त्युत्तरामुळेच अतिरेक्‍यांना पहाटे चार वाजेपर्यंत हॉटेलच्या सहाव्या मजल्यावर थोपविता आले. पोलिस आणि अतिरेक्‍यांच्या या थरारक चकमकीचा प्रत्येक क्षण न्‌ क्षण तेथील क्‍लोज सर्किट टीव्हीने टिपला. रात्री अकरा ते पहाटे तीन वाजेपर्यंत या संपूर्ण कारवाईची माहिती पोलिस आयुक्तांना देताना नांगरे पाटील यांच्या तोडून आलेली वाक्‍ये त्यांच्या पथकाने अतिरेक्‍यांशी एकहाती दिलेल्या झुंजीची कहाणी सांगतात. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध झाल्यानंतर "ऑपरेशन ताज'च्या कारवाईतील पोलिसांच्या धडाडीचे महत्त्वपूर्ण बारकावेही प्रसिद्धिमाध्यमांपुढे आले.
मुंबईवर घातपाती हल्ला करण्यासाठी आलेल्या दहा अतिरेक्‍यांपैकी चौघांनी हॉटेल ताजचा ताबा घेतल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडून कळताच आठ पोलिस आणि हॉटेल ताजचे मुख्य सुरक्षा अधिकारी सुनील कुडियादी यांना सोबत घेऊन उपायुक्त नांगरे पाटील ताजमध्ये शिरले. रात्री 9.55 वाजता हॉटेलमध्ये प्रवेश करताच दुसऱ्या मजल्यावर गेलेल्या नांगरे पाटील यांनी अतिरेक्‍यांवर त्यांच्याकडील ग्लॉक रिव्हॉल्व्हरमधून तीन गोळ्या झाडल्या. यानंतर अतिरेक्‍यांनीही पोलिसांच्या पथकावर एके-47 ने गोळीबार सुरू केला. या वेळी नांगरे पाटील यांच्या रिव्हॉल्व्हरमधून सुटलेल्या गोळीने अतिरेक्‍याच्या पायाचा वेध घेतल्याचेही या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये पाहायला मिळते. पोलिसांवर गोळीबार आणि बॉम्बहल्ला करीत सहाव्या मजल्यावर गेलेल्या अतिरेक्‍यांना तेथेच थोपविण्याचे आव्हान असल्याने मोजक्‍याच पोलिसांसोबत सहाव्या मजल्यावर पोलिसांनी सतत गोळीबार सुरू ठेवला. अतिरेक्‍यांकडे असलेल्या आधुनिक शस्त्रांचा मुकाबला करताना येणाऱ्या अडचणी नांगरे पाटील वायरलेसवरून पोलिस आयुक्त आणि पोलिस नियंत्रण कक्षात बसून या ऑपरेशनला दिशा देणारे गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना सांगत होते. विशेष शाखेचे उपायुक्त राजवर्धन त्यांच्यासोबत या कारवाईत आघाडीवर होते. अतिरेक्‍यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणारे पोलिस दुसऱ्या मजल्यावर असताना अतिरेक्‍यांनी त्यांच्यावर हातबॉम्ब फेकले आणि त्यापाठोपाठ गोळीबार सुरू ठेवला. या हल्ल्यात कॉन्स्टेबल राहुल शिंदे जागीच गतप्राण झाले; तर दोन कॉन्स्टेबल गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाले. हातबॉम्बच्या स्फोटांत दोन पोलिस अधिकारी जखमी झाले. अतिरेक्‍यांना नवीन इमारतीत शिरू न देण्यासाठी पोलिसांची सुरू असलेली धडपड सीसीटीव्हीने टिप
ली आहे. या इमारतीत अतिरेक्‍यांनी शिरकाव केला असता तर प्रचंड मनुष्यहानी झाली असती. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नौदलाच्या कमांडोंनी हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र पोलिसांना मोकळा श्‍वास घेता आला; मात्र तोपर्यंत हॉटेलमध्ये अडकलेल्या शेकडो नागरिकांची सुखरूप मुक्तता झाली होती.

2 comments:

lion9 said...

व्यर्थ न हो हे मराठी पोलीसाचे बलीदान ! तुम्हीं म्हणाल येथे का भाषावाद आणता ? हा भाषावाद ईग्रजी व हिंदी मिडीयाने केला. NSG जवाना कडे असलेली हत्यारे पोलीसाकडे असतीतर ह्या करवाईचा निकाल 60 तास लांबला नसता. व येवढे नागरीकही मारले नसते. पण पोलीसाच्या शहीदाची संख्या जास्त असती. व कदाचीत अजुन काही अतेरीकी जिवंत मिळाले आसते. (अतेरीकी जिवंत पकडण्याचा विक्रम ह्या पोलीसानी केला हे विसरु नका) पण ह्या मिडीया ने करकरे,कामटे,साळसकर सोडल्यास पोलीस अपयशी ठरले व कमांडोनेच सर्व काही केले आसे सांगीतले जाते. हा हेतुस्परपर मराठीचा पणउअतार करण्याचा प्रकार आहे. चव्हाण साहेब आपण मराठी पोलीसांचे शैर्य छापल्या बद्दल धन्यवाद.
जय महाराष्ट्र.

lion9 said...

व्यर्थ न हो हे मराठी पोलीसाचे बलीदान ! तुम्हीं म्हणाल येथे का भाषावाद आणता ? हा भाषावाद ईग्रजी व हिंदी मिडीयाने केला. NSG जवाना कडे असलेली हत्यारे पोलीसाकडे असतीतर ह्या करवाईचा निकाल 60 तास लांबला नसता. व येवढे नागरीकही मारले नसते. पण पोलीसाच्या शहीदाची संख्या जास्त असती. व कदाचीत अजुन काही अतेरीकी जिवंत मिळाले आसते. (अतेरीकी जिवंत पकडण्याचा विक्रम ह्या पोलीसानी केला हे विसरु नका) पण ह्या मिडीया ने करकरे,कामटे,साळसकर सोडल्यास पोलीस अपयशी ठरले व कमांडोनेच सर्व काही केले आसे सांगीतले जाते. हा हेतुस्परपर मराठीचा पणउअतार करण्याचा प्रकार आहे. चव्हाण साहेब आपण मराठी पोलीसांचे शैर्य छापल्या बद्दल धन्यवाद.
जय महाराष्ट्र.