Tuesday, March 17, 2009

कसाबच्या सुरक्षेसाठी 175 जवान

जयंत पाटील ः केंद्र सरकारची प्रस्तावाला मंजुरी


मुंबई हल्ल्यातील अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता त्याच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसचे 175 जवान पाठविण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मुंबईवर अतिरेकी हल्ला करणाऱ्या दहा अतिरेक्‍यांपैकी मोहम्मद अजमल कसाब हा एकमेव अतिरेकी पोलिसांच्या ताब्यात आहे. लष्कर-ए-तय्यबाशी संबंध असलेल्या कसाबने या हल्ल्यासंबंधिची इत्थंभूत माहिती भारतीय तपास यंत्रणांना दिली आहे. त्यामुळे त्याच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. अंडरवर्ल्ड टोळ्या तसेच लष्कर-ए-तय्यबाच्या अतिरेक्‍यांकडून कसाबचा घात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या ऑर्थर रोड तुरुंगात असलेल्या कसाबला उच्च दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानविरुद्ध असलेला एकमेव पुरावा म्हणून कसाबच्या सुरक्षिततेचा विचार करता राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केंद्रीय सुरक्षा दलाची मागणी केली होती. राज्य सरकारची ही विनंती केंद्राने मान्य केली असून पावणेदोनशे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसचे पावणेदोनशे जवान मुंबईत पाठविण्यात येणार असल्याचे गृहमंत्री जयंत पाटील म्हणाले. ऑर्थर रोड कारागृहात कसाबवरील खटला सुरू असताना सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.


(sakal,9 march)

No comments: