Tuesday, March 17, 2009

सुमन मोटेल्सच्या व्यवस्थापकीय संचालकास अटक

गुंतवणूकदारांची फसवणूक : कोट्यवधी रुपयांचा गंडा

हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना फसविल्याप्रकरणी पोलिसांना हव्या असलेल्या सुमन मोटेल्सच्या व्यवस्थापकीय संचालकासह तिघा जणांना माटुंगा पोलिसांनी आज अटक केली. वॉरन्ट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करून पळून जात असताना त्यांना अटक करण्यात आल्याचे माटुंगा पोलिसांनी सांगितले.

माटुंगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे सुमन मोटेल्सचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र खंदार, त्यांची पत्नी व संचालक भारती खंदार यांच्याविरुद्ध न्यायालयातून आलेले वॉरंट बजावण्यासाठी आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलिस गेले होते. या वेळी घरात असलेल्या सुरेंद्र खंदार आणि त्यांचा मुलगा तेजस यांनी पोलिसांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली. धक्काबुक्कीनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या तिघांना पोलिसांनी अटक केली.

देशभरातील गुंतवणूकदारांना फसविल्याप्रकरणी सुमन मोटेल्सच्या संचालक मंडळाविरुद्ध ठिकठिकाणी गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही वर्षांत सुमन मोटेल्सविरुद्ध विविध राज्यांतून दीडशेहून अधिक अटक वॉरंट आणि तेवढेच समन्स आले होते. हॉलिडे होम्स, वृक्षलागवड आणि रिसॉर्टस्‌च्या 12 आकर्षक योजनांच्या माध्यमातून 62550 गुंतवणूकदारांना कोट्यवधींना फसविल्याचा सुमन मोटेल्सचा मोठा घोटाळा 2001 मध्ये उघडकीस आला होता.

(sakal,11 march)

No comments: