Tuesday, March 17, 2009

सोळावर्षीय युवतीकडून एलआयसी एजन्टचा खून

दारूचे व्यसन जडलेल्या सोळावर्षीय तरुणीने पैशांसाठी आपल्या साथीदाराच्या मदतीने दारूच्या नशेतच एका एलआयसी एजन्टचा वसईच्या बाफना फाटा येथे बांबूने आणि दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार आज उघडकीस आला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट -12 च्या पोलिसांनी आरोपी युवतीला पकडून माणिकपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

बोरिवलीच्या काजूपाडा परिसरात राहणारा एलआयसी एजन्ट रत्नाकर कोंडलकर (50) यांचा मृतदेह माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 5 मार्चला सापडला होता. या वेळी मारेकऱ्यांनी कोंडलकर यांच्याकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि चिनी बनावटीचा मोबाईल चोरून नेल्याचे तपासात उघडकीस आले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांना कोंडलकर यांचा मोबाईल दहिसर पूर्वेला आपल्या आजी आजोबांसह राहणाऱ्या गुडिया नावाच्या सोळा वर्षांच्या युवतीकडे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती दारूचे व्यसन असलेल्या गुडियाने जेवणाकरिता पैसे मिळावेत या उद्देशाने साथीदार रिक्षाचालक दिनेश चतुर्वेदी ऊर्फ मनोज चौबे (35) याच्यासोबत कोंडलकर यांची हत्या केल्याची कबुली दिली. आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी केलेल्या दुसऱ्या विवाहामुळे आजी-आजोबांकडे राहणाऱ्या गुडियाला दारूचे व्यसन जडले होते. त्यासाठी अनेकदा ती अनोळखी व्यक्तींसोबतही मैत्री करायची. 4 मार्च रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दारू पिण्याकरिता ती तिच्या ओळखीच्या दिनेश चतुर्वेदीसोबत गेली होती. दारू पिल्यानंतर दोघांना जेवणासाठी पैसे हवे होते. त्यासाठी दिनेशने त्याच्या ओळखीच्या असलेल्या कोंडलकर यांना वसई येथे माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाफना फाटा येथे नेले. त्यानंतर तेथे दोघांनी कोंडलकर यांच्याकडे पैशाची मागणी केली. पैसे देत नसल्याचा राग मनात धरून दोघांनी कोंडलकर यांना दगड आणि बांबूने बेदम मारहाण करून ठार मारले.
याप्रकरणी दिनेश चतुर्वेदी अद्याप फरारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

(sakal,12 march)

No comments: