Monday, March 30, 2009

आयपीएलवरून सरकार व पोलिस अधिकाऱ्यांतही दोन गट

राज्यातील सामने ः अजूनही तळ्यात मळ्यात

लोकप्रिय आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे सामने महाराष्ट्रात आयोजित करण्यावरून राज्य सरकारमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीप्रमाणेच पोलिस अधिकाऱ्यांतही दोन गट पडले आहेत. मतदानाच्या प्रत्यक्ष तारखा वगळता सामने आयोजित करण्यास मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांची काहीही हरकत नसली तरी राज्याचे पोलिस महासंचालक (निवडणूक) सुप्रकाश चक्रवर्ती यांना मात्र 30 एप्रिलचा मतदानाचा अखेरचा टप्पा होईपर्यंत हे सामने होऊ नयेत, असे ठामपणे वाटते. आपण तसा लेखी अहवाल सरकारला देणार असल्याचे चक्रवर्ती यांनी "सकाळ'ला सांगितले.
आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक आणि त्याची सुरक्षा यावरून केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी नकारात्मक भूमिका घेतल्यापासून या सामन्यांचे आयोजन अडचणीत आले आहे. विविध राज्यांत असणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारांनी त्याबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. या स्पर्धेचे संयोजक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ असल्याने आणि हे मंडळ केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रभावाखाली असल्याने महाराष्ट्र या स्पर्धांबाबत काय भूमिका घेतो, याला विशेष महत्त्व आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या स्पर्धेच्या सुरक्षेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी भूमिका घेतली आहे; मात्र राज्याचा गृहविभाग राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांच्याकडे असल्याने या प्रश्‍नावर मंत्रिमंडळातही संघर्ष उभा राहिला आहे. सामन्यांबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी काल (गुरुवारी) रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि गृहमंत्री पाटील हेही उपस्थित होते. दीर्घ चर्चेनंतर महाराष्ट्रात आयोजित व्हायच्या एकूण 18 सामन्यांपैकी 14 सामन्यांना वेळापत्रकानुसार "ना हरकत' देण्याचा आणि सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बीसीसीआयला पत्रही जाणे अपेक्षित होते; मात्र मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज रात्रीपर्यंत या पत्रावर सही केली नव्हती.
राज्यातील निवडणुकीची विशेष जबाबदारी सध्या चक्रवर्ती यांच्यावर आहे. त्यांचा मात्र निवडणूक काळात सामने आयोजित करण्याला विरोध आहे. राज्यातील पोलिस बळ मुळात अपुरे असताना ही जोखीम घेऊ नये अशी भूमिका त्यांनी "सकाळ'कडे मांडली. हे सामने मुंबईत ब्रेबॉर्न, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील आणि नागपूरच्या नव्या स्टेडियमवर होणार आहेत. निवडणुकीच्या काळात मुंबईतील पोलिसांना मतदानाच्या वेळापत्रकानुसार राज्याच्या इतर भागांत पाठविले जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील पोलिस दल सामन्यांसाठी सुरक्षा पुरविण्यास अपुरे ठरेल, असे त्यांचे मत आहे. "कोणत्याही कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याप्रमाणेच माझी भूमिका आहे. 30 एप्रिलचा मतदानाचा शेवटचा टप्पा झाल्यानंतर मात्र हे सामने घेण्याला आपली हरकत नाही', असेही त्यांनी सांगितले.
मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांना मात्र या सामन्यांना सुरक्षा पुरविण्यात काही अडचण येईल असे वाटत नाही. "सामन्यांचे निश्‍चित वेळापत्रक अद्याप तयार झालेले नाही. त्यामुळे आमच्या सूचना गृहित धरूनच मंडळ सामन्यांचे वेळापत्रक आखेल. ऐन मतदानाच्या काळात सामने आयोजित केले नाहीत तर काही अडचण येईल असे वाटत नाही', असे त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

(sakal,20 march )

No comments: