Wednesday, March 18, 2009

निवडणुकांची जबाबदारी सुप्रकाश चक्रवर्तींवर

पोलिस महासंचालकपद ः निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नियुक्ती

मुख्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील निवडणुकांचे कामकाज पाहण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे महासंचालक सुप्रकाश चक्रवर्ती यांची पोलिस महासंचालक (निवडणुका) या पदावर नियुक्ती करण्यात आली. राज्यात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका निर्भयपणे आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यात येतील. निवडणुकांत कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. तसा प्रयत्न झाल्यास कोणत्याही पक्षाचा कितीही मोठा नेता असो, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन चक्रवर्ती यांनी "सकाळ'शी बोलताना केले.

उच्च न्यायालयाने निवड अवैध ठरविल्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकपदी एस. एस. विर्क यांची सरकारने नेमणूक केली; मात्र विर्क यांना निवडणुकीच्या कामकाजात भाग घेण्यास निवडणूक आयोगाने मनाई केल्याने अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. पी. श्रीवास्तव यांच्याकडे ही जबाबदारी सरकारने सोपविली. त्यातच कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजीव दयाल हे दीर्घकालीन रजेवर गेले. राज्य पोलिस दलातील एकंदरीत स्थिती पाहता सबंध राज्याच्या निवडणुकीचे कामकाज पाहण्याची जबाबदारी महासंचालकपदाच्या अधिकाऱ्याकडे सोपविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यानुसार या पदावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे महासंचालक सुप्रकाश चक्रवर्ती यांची नेमणूक करण्यात आली. तीन अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून राज्याच्या पोलिस महासंचालकपदी अनामी रॉय यांच्या झालेल्या नियुक्तीच्या विरोधात चक्रवर्ती यांनी "कॅट'मध्ये व पुढे उच्च न्यायालयात धाव घेतली होती. चक्रवर्ती यांच्या न्यायालयीन लढाईमुळेच राज्य सरकारला रॉय यांच्या जागी एस. एस. विर्क यांच्या रूपात नवीन पोलिस महासंचालकाची निवड करावी लागल्याचे बोलले जाते. पोलिस महासंचालक कार्यालयात आज सकाळी चक्रवर्ती यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. याच वेळी अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. पी. श्रीवास्तव यांच्याकडे कायदा व सुव्यवस्था विभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे.

राज्यात तीन टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकांच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यावर भर दिला जाईल. अतिशय निर्भय आणि मोकळ्या वातावरणात या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर चक्रवर्ती यांनी "सकाळ'शी संवाद साधताना सांगितले. निवृत्तीला काही महिने असतानाच राज्य निवडणूक आयोगाने दिलेली ही जबाबदारी अतिशय चोख आणि प्रामाणिकपणे पार पाडणार आहोत. निवडणुकीच्या काळात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल. निवडणुकांत कसल्याही गैरप्रकारांना अजिबात थारा दिला जाणार नाही. तसा प्रयत्न करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही चक्रवर्ती यांनी या वेळी सांगितले.


अमानी रॉय नियुक्तीच्या प्रतीक्षेत


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याच्या पोलिस महासंचालकपदावरून दूर केल्यानंतर रजेवर गेलेले माजी पोलिस महासंचालक अनामी रॉय सध्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून अधिकृत नियुक्ती होण्याची सध्या आपण वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया रॉय यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.
माजी पोलिस महासंचालक अनामी रॉय सध्या रजेवर आहेत. नियुक्तीचे नवीन आदेश निघेपर्यंत ते रजेवरच राहण्याची शक्‍यता गृह खात्यातील अधिकाऱ्यांनी वर्तविली. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे अधिकाऱ्यांची बदली अथवा नियुक्ती करण्यासंबंधीची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. रॉय यांची नवीन पदावर निवड करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू असली तरी त्यांच्या नेमणुकीबाबतचे आदेश निवडणुकीनंतरच निघतील, अशी पोलिस वर्तुळात चर्चा आहे. विर्क यांची पोलिस महासंचालकपदी निवड झाल्यानंतर रिक्त असलेल्या गृहनिर्माण खात्याच्या महासंचालकपदावर अनामी रॉय यांची नियुक्ती होण्याचे अथवा केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीवर जाण्याचे विकल्प उपलब्ध असल्याचे बोलले जाते.

No comments: