सहआयुक्तांची माहिती : आरोपी विमानतळावरील लोडर
चित्रपट कलावंत, उद्योजक, राजकारणी अशा देशभरातील निवडक धनाढ्यांकरिता लंडनहून मागविण्यात येणाऱ्या "व्हर्टू' या ख्यातनाम मोबाईल कंपनीचे तीन मोबाईल चोरल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहार एअरपोर्टवरील दोघा लोडरना अटक केली आहे. प्रत्येकी साडेपाच लाख रुपये किंमत असलेले हे मोबाईल फोन प्रत्येकी अडीच लाख रुपयांना विकले जाणार होते, असे तपासात उघडकीस आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. पोलिसांनी चोरीला गेलेले हे मोबाईल हस्तगत केले आहेत.
बाबू करीअप्पा कावटी (22, रा. दहिसर) आणि अखिलेश मिश्रा (21, रा. विलेपार्ले) अशी या दोघा लोडरची नावे आहेत. लंडन येथे बनविण्यात येणाऱ्या या मोबाईल फोनचे वितरण भारतात भिवंडी येथील "मेट्रिक्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड' या एजन्सीमार्फत केले जाते. जगप्रसिद्ध फरारी स्पोर्टिंग कार कंपनीसोबत टायअप असलेल्या व्हर्टू कंपनीने बनविलेले हे निवडक मोबाईल फोन मुंबईत 20 ते 25 फेब्रुवारीदरम्यान विक्रीकरिता आणण्यात आले. सहार येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्गोतून उतरविण्यात आलेल्या या मोबाईलचे कार्टन केंद्रीय सीमा शुल्क विभागाकडे तपासणीकरिता गेले. मॅट्रिक्स कंपनीसाठी विमानतळावरील क्लिअरिंग व फॉर्वर्डिंग करणाऱ्या ओमेगा कंपनीत काम करणारे लोडर बाबू कावटी आणि अखिलेश मिश्रा यांनी या कार्टनमधील तीन मोबाईल फोन काढून घेतले. कार्टनमधून झालेल्या या चोरीची माहिती मॅट्रिक्स कंपनीत फार उशिरा उघडकीस आली. यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या युनिट- 9 च्या पोलिसांना दोघे तरुण अतिशय महागडे मोबाईल फोन अर्ध्याहून कमी किमतीत विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून कावटी आणि मिश्रा या दोघांना अंधेरीच्या वैभव हॉटेलजवळ बोलावून घेतले. तेथेच त्यांना अटक केल्याचे मारिया यांनी सांगितले. निवडक लोकांकडेच असणाऱ्या "व्हर्टू' या मोबाईल फोनद्वारे जगात कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही ठिकाणी हॉटेल बुकिंग, विमानाच्या तिकिटांचे बुकिंग यांसारख्या अनेक सुविधा विनामूल्य मिळतात, असे सूत्रांनी सांगितले.
(sakal,25 march)
No comments:
Post a Comment