Tuesday, March 17, 2009

खंदकांचे जड झाले ओझे...

कमी पोलिस बळ ः खंदक झाले सायकलींचे स्टॅण्ड


मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यांसारखे हल्ले पुन्हा होऊ नयेत; तसेच अशा हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून मुंबई व ठाणे शहरात ठिकठिकाणी तयार करण्यात आलेल्या खंदकांत पोलिसच तैनात नसल्याने हे खंदक आता सर्वसामान्य नागरिकांसाठी अडचणीचे ठरू लागले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते, पदपथ आणि रेल्वेस्थानकांवर असलेल्या या खंदकांमुळे नागरिकांना साधे चालणेही शक्‍य होत नाही.

सागरी मार्गाने आलेल्या "लष्कर-ए-तैयबा'च्या दहा अतिरेक्‍यांनी मुंबईत थैमान घातले होते. तीन दिवस चाललेल्या अतिरेक्‍यांच्या कारवायांमुळे सामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांत आत्मविश्‍वास निर्माण व्हावा; तसेच अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या वेळी तातडीने कारवाई करणे शक्‍य व्हावे, यासाठी मुंबई शहरात 400 ठिकाणी कायमस्वरूपी खंदक उभारण्यात आले आहेत. या खंदकांमध्ये दिवसरात्र शस्त्रधारी पोलिस तैनात करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्याचे अभिवचन पोलिसांनी दिले होते. मुंबईतील हल्ल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस रेल्वेस्थानके, विमानतळ, धार्मिक स्थळे, गर्दीची ठिकाणे यांच्यासह शहरात असलेल्या संवेदनशील ठिकाणी रेतीने भरलेल्या गोण्यांच्या साह्याने उभारण्यात आलेल्या या खंदकांमध्ये शस्त्रधारी पोलिस तैनात करण्यात आले; मात्र काही दिवसांतच बहुतांश ठिकाणी असलेल्या खंदकांत पोलिसांनी उभे राहणेच बंद केले आहे. खंदकांमध्ये पोलिसांनी थांबणे बंद केल्यामुळे काही ठिकाणी खंदकांची दुरवस्था झाली आहे. या खंदकांसाठी वापरलेल्या गोणी रस्त्यात अस्ताव्यस्त पडल्या आहेत. काही ठिकाणी या खंदकांचा उपयोग सायकली उभ्या करण्यासाठी होताना दिसतो. एका खंदकासाठी दिवस आणि रात्रपाळी असे मिळून प्रत्येकी आठ पोलिस ठेवण्यात येत होते. त्यामुळे नागरिकांना किमान चार शस्त्रधारी पोलिस या खंदकांमध्ये कायमस्वरूपी दिसत असत. डोळ्यांत तेल घालून मुंबईत पहारा करणारे हे पोलिस पाहून नागरिकांत सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती; शिवाय गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांनाही या पोलिसांचा धाक निर्माण झाला होता. मुंबई हल्ल्यानंतर नागरिकांत निर्माण झालेली भीती ओसरल्यानंतर बऱ्याच ठिकाणी असलेल्या या खंदकांत पोलिस तैनात करणे बंद करण्यात आल्याचे समजते. न
ागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपण कटिबद्ध आहोत; मात्र शहरातील संवेदनशील ठिकाणी उभारण्यात आलेल्या या खंदकांत दिवसरात्र पोलिस तैनात करणे कमी मनुष्यबळामुळे शक्‍य होत नसल्याचे पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

-------

मुंबई हल्ल्यानंतर नागरिकांत असलेली भीती दूर करण्यासाठी हे खंदक उभारण्यात आले; त्यात आता 24 तास पोलिस उभे राहण्याची आवश्‍यकताही नाही. घातपाती कारवाया करणाऱ्यांसोबत मुकाबला करताना खंदक बांधणे शक्‍य होत नाही. अशा प्रकारच्या हल्ल्याच्या वेळी पोलिसांना तातडीने "पोजिशन' घेता यावी यासाठी संवेदनशील ठिकाणी हे खंदक उभारण्यात आले आहेत. तसेच अल्प मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मुंबई पोलिसांनी राज्य सरकारकडे चार हजार नवीन पदे भरण्याचा प्रस्ताव दिला आहे.

- विजयसिंग जाधव (पोलिस उपायुक्त, मुख्यालय)

(sakal,2 march)

No comments: