Wednesday, March 18, 2009

दहावीच्या विद्यार्थिनीची नैराश्‍यातून आत्महत्या

पेपर अवघड गेल्याचा अंदाज


घाटकोपर येथील पंतनगरमधील एका दहावीच्या विद्यार्थिनीने ती राहत असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आज आत्महत्या केली. परीक्षेचा पेपर अवघड गेल्यामुळे आलेल्या तणावातून तिने ही आत्महत्या केल्याचे समजते; परंतु पोलिसांनी आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे सांगितले. आत्महत्येच्या प्रकारानंतर पंतनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भावी दीपक देसाई (वय 16) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. घाटकोपर पूर्वेला असलेल्या शांतीपार्क सोसायटीत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आज सकाळी भूगोल व अर्थशास्त्र या विषयाचा पेपर देऊन ही विद्यार्थिनी घरी परतली. ती गरोडियानगर येथील पुणे विद्याभवनच्या शाळेत शिकत होती. शांतीपार्क सोसायटीतील सरिना अपार्टमेंटमध्ये परतल्यानंतर घरी न जाता ती थेट गच्चीवर गेली. तेथून तिने उडी मारून आपले जीवन संपविले. भावीच्या वडिलांचा रसायन वाहतुकीचा व्यवसाय आहे. आई-वडील आणि तीन बहिणी असे कुटुंब असलेली भावी घरातील सर्वांत धाकटी आणि हुशार मुलगी होती. मात्र परीक्षेचे पेपर अवघड गेल्यामुळे ती निराश झाली होती. या नैराश्‍यातूनच तिने हा प्रकार केल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेला आहे. आत्महत्येमागील खरे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. घटनेच्या अधिक चौकशीसाठी तिच्या शाळेत जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

(sakal,17 march)

No comments: