Monday, March 30, 2009

23 कोटी रुपयांची वीजचोरी

पुण्यातील दोघा बड्या उद्योजक कंपन्यांनी 23 कोटी रुपयांच्या विजेचा अनधिकृतरीत्या वापर केल्याचे उघडकीस आले आहे. विजेचा हा अनधिकृत वापर उघडकीस आणणाऱ्या महावितरणच्या दक्षता आणि सुरक्षा संचालनालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आज व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
येरवडा परिसरात असलेल्या मे. जेस्को कॉर्पोरेशन या कंपनीने औद्योगिक वापरासाठी वीज घेऊन त्यांच्या युनिटच्या जवळच असलेल्या जीई प्लाझा या व्यापारी संकुलातील व्यावसायिक ग्राहकांना अनधिकृतरीत्या वीज जोडण्या दिल्या होत्या. या संकुलात असलेल्या प्रत्येक ग्राहकाला स्वतंत्र मीटर जोडून देऊन त्यानुसार जेस्को कॉर्पोरेशन कंपनी वीजबिल वसुली करीत होती. एका समांतर वीज वितरण कंपनीप्रमाणे व्यवहार करणाऱ्या जेस्को कंपनीने किमान 21 कोटी 63 लाख रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर केल्याचे उघडकीस आले. विजेचा गैरप्रकार उघडकीस येण्याची राज्यातील ही आजवरची सर्वात मोठी घटना आहे. याच प्रकारे पुण्यातील मे. साजदा इंडस्ट्रीज या ग्राहकाने एक कोटी 29 लाख रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर केल्याचेही उघडकीस आले आहे. हे दोन्ही गैरप्रकार उघडकीस आणणारे पुणे परिमंडळाचे दक्षता, सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदूलकर, फिरत्या पथकाचे उपकार्यकारी अभियंते एस. आर. शिरोलीकर यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आज मुंबईत सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी संचालक (संचालन) विजय सोनवणे आणि विशेष पोलिस महानिरीक्षक व महावितरणचे दक्षता व सुरक्षा मंडळाचे संचालक हेमंत नगराळे उपस्थित होते.

(sakal,18 march)

No comments: