राकेश मारिया : पोलिसांसोबत नागरिकांचा पुढाकार गरजेचा
बाबरी मशिदीच्या पतनानंतर उसळलेल्या जातीय दंगलींनी मुंबईतील अंडरवर्ल्डला धार्मिक रेषेने विभागले. यापूर्वी घातपाती कारवायांकरिता अशिक्षित आणि गरजूंचा वापर केला जात असे; मात्र इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्यांना अटक केल्यानंतर या कारवायांसाठी उच्चशिक्षित आणि चांगल्या घरातील तरुणांचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले. गुन्हेगारीविश्वाचे हे बदलते चित्र मन हेलावणारे असून, शांतता प्रस्थापित होण्यासाठी आता पोलिसांसोबत नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्यक झाल्याचे मत गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी व्यक्त केले.
"प्रेस क्लब ऑफ मुंबई'च्या वतीने "मुंबईतील गुन्हेगारीचे बदलते स्वरूप' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राकेश मारिया बोलत होते. गेल्या दोन दशकांपासून मुंबई दहशतवाद्यांचे मुख्य टार्गेट झाले आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेला अतिरेकी हल्ला आणि पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट खेळाडूंवर झालेला हल्ला सर्वसामान्यांच्या विचारापलीकडचा आहे. गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी जगतात झालेल्या बदलांमुळे गुन्हे उघडकीस आणताना पोलिसांसमोरही बरीच आव्हाने निर्माण होत असल्याचे मारिया यांनी या वेळी सांगितले.
...............
रामपुरी ते एके-47
1960 पासून रामपुरी चाकूने सुरू झालेला मुंबईतील गुन्हेगारीचा अध्याय आता एके-47 पर्यंत पोहोचल्याचे विशद करताना हाजी मस्तान, करीम लाला, युसूफ पटेल यांच्या गुन्हेगारी टोळ्यांची माहितीही त्यांनी दिली. 22 व 23 नोव्हेंबर 1969 च्या मध्यरात्री पहिल्यांदा गुन्हेगारी विश्वात रिव्हॉल्व्हरचा वापर करण्यात आला. त्या वेळी दारू, वेश्याव्यवसाय, मटका यांसारख्या व्यवसायांना संरक्षण देण्यासाठी दादागिरी सुरू असायची. यानंतरचा काळ वरदराजन, दाऊद, शरद शेट्टी, बडा राजन, करीम लाला यांसारख्या गुन्हेगारांनी गाजविला. 1990 मध्ये मुंबईत गुन्हेगारी टोळ्यांनी खंडण्या उकळायला सुरुवात केली. 1992 नंतर मात्र गुन्हेगारीचे स्वरूप पुरते बदलून गेल्याचे मारिया यांनी सांगितले.
..............
धार्मिक दुही
6 डिसेंबर 1992 ला झालेले बाबरी मशिदीचे पतन आणि त्यानंतर उसळलेल्या जातीय दंगलींनी मुंबईतील अंडरवर्ल्डचे धार्मिक दुहीत विभाजन केले. मार्च 93 ला झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर मुंबईवर दहशतवादी कारवायांना सुरुवात झाली. या कारवायांसाठी सीमेपलीकडे बसलेल्या घातपाती शक्तींनी मुंबईच्या अंडरवर्ल्डचाच वापर केला. गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी आणि दहशतवादी घडामोडींत आमूलाग्र बदल झाले. आता अंडरवर्ल्ड टोळ्यांमध्ये खबऱ्यांची संख्याही कमी झाल्यामुळे अनेकदा पोलिसांना पक्की माहिती मिळत नसल्याचेही मारिया या वेळी म्हणाले.
(sakal,5 march)
No comments:
Post a Comment