Tuesday, March 17, 2009

स्वतःच्या मुलाची हत्या करणाऱ्या केशवराव भोसलेंना पश्‍चाताप

19 मार्चपर्यंत कोठडी ः गोळ्या घालून मुलाची हत्या

मालमत्तेच्या वादातून स्वतःच्या दोघा मुलांवर गोळीबार आणि त्यातील एकाची हत्या केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे नेते केशवराव भोसले यांना मलबार हिल पोलिसांनी काल अटक केली. आज न्यायालयात हजर करण्यात आलेल्या भोसलेंना 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त संजय मोहिते यांनी दिली. दरम्यान, मुलांवर केलेल्या गोळीबारप्रकरणी आता केशव भोसलेंना पश्‍चाताप होत असल्याची माहिती पोलिस दलातील सूत्रांनी दिली.

मलबार हिल येथील "पार्श्‍व' इमारतीत राहणाऱ्या केशवराव भोसले यांनी पहिल्या पत्नीच्या वर्षश्राद्धाच्या दिवशीच राजेश आणि गणेश या दोन मुलांवर 6 मार्चला गोळीबार केला होता. या गोळीबारात गणेश भोसले छातीत आणि डोक्‍यात गोळ्या लागल्याने ठार झाला, तर दुसरा मुलगा राजेश याच्यावर अद्याप सेंट एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलांनी हातावर तलवारीने वार केल्यामुळे जखमी झालेल्या केशवराव भोसलेंवर भाटिया रुग्णालयात उपचार सुरू होते. काल रुग्णालयातून बाहेर पडलेल्या भोसलेंना मलबार हिल पोलिसांनी अटक केली. आज सकाळी त्यांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली. पत्नीच्या निधनानंतर दोन मुलांवर अतोनात प्रेम करणाऱ्या भोसलेंनी महालक्ष्मी रेसकोर्सवर दोघांची लग्ने मोठ्या धडाक्‍यात केली होती. गेल्या शुक्रवारी लहानशा वादातून उद्‌भवलेल्या गोळीबाराच्या गंभीर प्रकरणानंतर भोसलेंना पश्‍चातापाशिवाय काहीच करता येत नसल्याचे पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले. राजभवन येथील तस्करी प्रकरणात गुंतलेले भोसले गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय सहभागी झाले होते. त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर खेड येथून विधानसभेची निवडणूकही लढविली होती. गेल्या काही दिवसांपासून ते कॉंग्रेस पक्षात सामील झाले होते.


(sakal,12 march)

No comments: