Tuesday, March 17, 2009

सुरक्षित मुंबईसाठी "जागृत मुंबईकर' मोहिमेला सुरुवात

गुन्हेगारीबाबत प्रबोधन : पोलिस, अग्निशमन दल, युरोका फोर्ब्सचा उपक्रम

"ये सरकार का प्रॉब्लेम है.. मेरे घर को तो कोई छू भी नही सकता..! ' सामान्य नागरिकांच्या डोळ्यात त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसंबंधी जळजळीत अंजन घालणारी ही जाहिरात वाहिनीवर नेहमीच झळकताना दिसते. स्वतःच्या सुरक्षिततेसंबंधी बेफिकीर असणाऱ्या सामान्य नागरिकांना शहरातील वाढती गुन्हेगारी आणि घातपातांच्या घटनांची जाणीव करून त्या रोखण्यासाठी प्रबोधन करणाऱ्या "जागृत मुंबईकर' या उपक्रमाची आज सुरुवात झाली. मुंबई पोलिस, अग्निशमन दल आणि युरेका फोर्ब्स यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात युरेका फोर्ब्सचे सात हजार कर्मचारी (युरोचॅम्प) मुंबईकरांना सुरक्षिततेचे धडे देणार आहेत.

स्वतःच्या घराबाहेर घडणारे गुन्हे, अतिरेकी हल्ले, नैसर्गिक आपत्ती, आगीसारख्या घटनांबाबत सामान्य नागरिक उदासीन असतात. हा प्रकार स्वतःबाबत झाल्यावर त्यांचे गांभीर्य लक्षात येते. या घटनांबाबत नागरिकांमध्ये दक्षता निर्माण होण्यासाठी युरेका फोर्ब्सचे "युरोचॅम्प' मुंबईतील किमान शंभर घरे असलेल्या प्रत्येक सोसायटीत पोचणार आहेत. या सोसायट्यात तेथील नागरिकांना दैनंदिन जीवनात घडणाऱ्या असामाजिक घटना रोखण्यासंबंधी मार्गदर्शन करतील. "निश्‍चितपणे सुरक्षित राहा' असे घोषवाक्‍य घेऊन मुंबईकरांना त्यांच्या सुरक्षिततेचे धडे देणाऱ्या या युरोचॅम्पसोबत अनेकदा मुंबई पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान असतील. घरात नोकर ठेवताना घ्यायच्या दक्षता; तसेच रस्त्यावर फिरताना कान आणि डोळे उघडे ठेवून एखाद्या घातपाती कारवाईला आळा कशा प्रकारे घालावा यासंबंधीचे मार्गदर्शन केले जाईल. पोलिस आयुक्त हसन गफूर, अग्निशमन दलाचे प्रमुख पी. डी. करगोप्पीकर व युरेका फोर्ब्सचे व्यवस्थापकीय संचालक एस. एल. गोकलानी यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात झाली. या अभियानात वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमांतून सामान्य नागरिकांपर्यंत सुरक्षिततेचा संदेश दिला जाणार आहे. अनेकदा दैनंदिन गुन्हेगारी घटनांबाबत नागरिकांना प्रबोधन करणे गरजेचे असते. युरेका फोर्ब्सच्या माध्यमातून हा प्रयत्न पूर्ण होईल, असा विश्‍वास पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी व्यक्त केला.आयपीएल'साठी कडक


---------


मुंबईतील क्रिकेटपटूंची सुरक्षितता वाढविणार

कराची येथे श्रीलंकन क्रिकेटपटूंवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत होणाऱ्या आयपीएल सामन्यांकरिता येणाऱ्या क्रिकेटपटूंच्या सुरक्षिततेसंबंधी अधिक कडक उपाययोजना करण्यात येतील. याशिवाय मुंबईत राहणाऱ्या क्रिकेटपटूंच्या संरक्षणात आवश्‍यकता भासल्यास वाढ करण्यात येईल, अशी ग्वाही पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी दिली.
मुंबईत होणाऱ्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, तसेच प्रचंड गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते. गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धेच्या वेळी हजारहून अधिक गणवेशधारी पोलिस मैदानात तैनात केले होते. साध्या वेशातील पोलिस प्रेक्षकांमध्ये तसेच गर्दीच्या ठिकाणी नेमले होते. क्‍लोज सर्किट टीव्हीच्या मदतीने मैदान आणि परिसरातील प्रत्येक घडामोडींवर पोलिसांचे लक्ष होते. या प्रकारच्या अत्युच्च दर्जाची सुरक्षितता मुंबईत होणाऱ्या आयपीएलच नव्हे, तर अन्य आंतरराष्ट्रीय आणि प्रचंड गर्दी असणाऱ्या स्पर्धांकरिता दिली जाणार असल्याचे गफूर यांनी सांगितले.

कसाबचे संरक्षण

मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्या जीविताला असलेला धोका लक्षात घेता इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस दलाच्या पोलिसांना त्याच्या सुरक्षिततेसाठी पाचारण केले जाणार आहे. पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी या वृत्ताला दुजोरा देत कसाबच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आवश्‍यक ती खबरदारी घेत असल्याचे सांगितले. कसाबला ऑर्थर रोड तुरुंगात हलविण्यापूर्वीच येथील सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याचेही गफूर या वेळी म्हणाले.


(sakal,3 march)

No comments: