Wednesday, March 18, 2009

वायुदलातील अधिऱ्याच्या मुलीचे अपहरण

तरुणीला अटक ः तिच्या साथीदाराचा शोध सुरू

अंधेरी येथे राहणाऱ्या वायुदलातील एका उच्चाधिकाऱ्याच्या तेरा वर्षांच्या मुलीच्या अपहरणप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी त्याच्याकडे काम करणाऱ्या तरुणीला अटक केली आहे. या प्रकरणी तिच्या आणखी एका साथीदाराचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक अहमदाबाद येथे रवाना झाले आहे. या वायुदल अधिकाऱ्याची ओळख सांगण्यास वर्सोवा पोलिसांनी मात्र नकार दिला.

चांदणी राजू अरोरा (20) असे या मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. वर्सोवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात बंगला येथे राहणाऱ्या या वायुदलातील अधिकाऱ्याला मनाली (15) आणि सोनाली (13, बदललेली नावे) या दोन मुली आहेत. चांदणी अरोरा ही तरुणी या अधिकाऱ्याच्या घरात मुलींची देखभाल आणि घरकाम एक वर्षापासून करीत होती. चांदणी मुलींच्या खोलीतच राहत असे. गेल्या काही दिवसांपासून आठवीला असलेल्या सोनालीची परीक्षा सुरू आहे. 13 मार्चला गणिताचा पेपर अवघड गेल्यामुळे आई-वडिलांचा रोष सहन करावा लागणार, अशी भीती तिला होती. त्यामुळे आदल्या रात्री तिने चांदनीला परीक्षेचा पेपर अवघड गेल्याचे सांगितले होते. आई-वडिलांचा ओरडा खायचा नसेल, तर घर सोडून निघून जाऊया, अशी योजना चांदणीने आखली. दुसऱ्या दिवशी भूगोलाच्या पेपरच्या दिवशी सकाळी चांदणी आणि सोनाली या दोघी लवकरच उठल्या आणि घरातून निघून गेल्या. धाकटी मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे वायुदलात बड्या पदावर असलेल्या सोनालीच्या वडिलांनी शोधाशोध करायला सुरवात केली. या वेळी त्यांच्याकडे येणाऱ्या दूधवाल्याने चांदणी आणि सोनालीला अंधेरीला जे.पी. रोडच्या दिशेने सकाळी जाताना पाहिल्याचे सांगितले. यानंतर या वायुदल अधिकाऱ्याने वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांताक्रूझ येथील सॉल्वेशन आर्मीमध्ये शिक्षण घेत असलेल्या चांदणीच्या बहिणीकडे चांदणीबाबत विचारणा केली. तिच्याकडून मिळालेल्या माहितीवरून चांदणी सोनालीला सुरवातीला सुरत येथे घेऊन गेल्याचे कळाले. त्यानंतर ती अहमदाबाद येथे गेल्याचे समजले. वर्सोवा पोलिसांनी अहमदाबाद पोलिसांशी संपर्क साधून तेथे सापळा रचून चांदणीला अटक केली. या वेळी तिच्यासोबत असलेल्या सोनालीला ताब्यात घेतले. चांदणीच्या चौकशीत तिचा सा
थीदार रोहित ऊर्फ दीपक याच्या मदतीने ती सोनालीचे अपहरण करणार होती, अशी माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांचे एक पथक अहमदाबाद येथे रोहितच्या शोधासाठी गेल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश नलावडे यांनी दिली. या प्रकरणी चांदणीला अटक केली असून सोनाली सुखरूप तिच्या आई-वडिलांकडे असल्याचेही नलावडे या वेळी म्हणाले.

(sakal,15 march)

No comments: