Monday, March 30, 2009

प्राणघातक हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

सहा महिन्यांपूर्वी भोईवाडा येथे राहायला आलेल्या वृद्ध दाम्पत्यावर मारेकऱ्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी गंभीररीत्या जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली. जखमी पत्नीवर के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भोईवाडा येथील मोराचीवाडी परिसरात असलेल्या इमारतीत ही गंभीर घटना घडली. गेल्या सहा महिन्यांपासून पंढरीनाथ नारायण कुलकर्णी (67) हे पत्नी प्रेरणा (57) हिच्यासोबत येथे राहत होते. 1984 मध्ये मिलमधील नोकरीवरून निवृत्त झालेले पंढरीनाथ कुलकर्णी यापूर्वी पत्नी प्रेरणासह बोरिवली येथे त्यांचा मुलगा मिलिंद याच्या घरी राहत होते. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी दोघांना काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेवटचे पाहिले. त्यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते राहत असलेल्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा आणि घरात अंधार असल्याचे परिसरातील काही नागरिकांच्या लक्षात आले. शेजाऱ्यांनी त्यांच्या घरात डोकावून पाहताच दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. त्यांनी या घटनेची माहिती तातडीने स्थानिक पोलिसांना दिली. जखमी अवस्थेतील प्रेरणा कुलकर्णी विव्हळत पडल्याचे पाहताच पोलिसांनी त्यांना के.ई.एम. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पंढरीनाथ कुलकर्णी हे मात्र जागीच ठार झाले होते. या दोघांवर अनोळखी मारेकऱ्यांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्यांविरुद्ध भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जखमी प्रेरणा कुलकर्णी यांची प्रकृती स्थिर आहे. त्या शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्याकडून या हल्ल्यासंबंधी माहिती मिळू शकेल. त्यानंतरच हल्ल्याचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंबादास गदादे यांनी दिली.

(sakal,20 march)

No comments: