Tuesday, March 17, 2009

रजा रद्द तरी कर्तव्यासाठी सज्ज

पोलिसांवर तिहेरी ताण : शिवजयंतीपर्यंत उसंत नाही

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणा नेहमीच सज्ज असते. सणासुदीला तर पोलिस अहोरात्र काम करताना दिसतात. या महिन्यात पोलिसांवर तिहेरी ताण पडला आहे. होळी, ईद-ए मिलाद आणि तिथीप्रमाणे येणारी शिवजयंती असे सण-उत्सव एकामागोमाग आल्याने पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र "सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद तंतोतंत पाळत पोलिस आपले काम चोख बजावत आहेत. कोणतीही कुरबूर न करता ते नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत.
नेहमीच अतिरेक्‍यांच्या हिटलिस्टवर असलेल्या मुंबईत सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर पडतात. उत्सव काळात घातपात घडवून अधिकाधिक हानी घडविण्याचे दहशतवादी संघटनांचे मनसुबे असतात. म्हणूनच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना सतत जागता पहारा ठेवावा लागतो. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर तर सुरक्षिततेसंबंधी पोलिसांना अधिक खबरदारी घ्यावी लागत आहे. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसांना गेल्या तीन महिन्यांत खूप कमी रजा मिळाल्या आहेत. मुंबई हल्ल्याचे आरोपपत्र दाखल होईपर्यंत काही पोलिसांच्या साप्ताहिक रजाही बंद करण्यात आल्या होत्या.
मुंबईत होळी, धुळवड, ईद ए मिलाद आणि तिथीप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचा ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनचालकांची कसून चौकशी केली. ईद-ए मिलादनिमित्त मुस्लिमबहूल भागातून जुलूस निघतात. यामध्ये कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले होते. यानंतर धुळवडीच्या दिवशीही हा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला. रंग लावण्यावरून होणाऱ्या वादाचे पर्यवसान मोठ्या घटनांत होऊ नये यासाठी काही ठिकाणी पोलिस होळी खेळणाऱ्या तरुणांना हा उत्सव शांततेत साजरा करण्याची समज देतानाही दिसत होते. पोलिसांचा बंदोबस्त शिवजयंतीपर्यंत तसाच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारपर्यंत पोलिसांना उसंत मिळण्याची चिन्हे कमीच आहेत.

--------

पोलिस उपनिरीक्षकाचे ठाण्यातच निधन


डोंगरी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षकाचे पोलिस ठाण्यातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. मधुकर किसन साठे (43) असे त्यांचे नाव आहे. कर्तव्यावर असताना अशा प्रकारे अधिकाऱ्याचे निधन झाल्यामुळे पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर असलेल्या कामाच्या ताणाचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
डोंगरी पोलिस ठाण्यात नेमणुकीवर असलेले मधुकर किसन साठे (43) काल रात्रपाळीला कामाला होते. पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास पोलिस ठाण्यातच त्यांच्या छातीत कळा यायला लागल्या. त्यांच्यासोबत असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना प्राथमिक उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला; मात्र पुढच्याच क्षणात हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍यामुळे त्यांचे निधन झाले. कळवा येथे राहणारे पोलिस उपनिरीक्षक साठे गेली काही वर्षे डोंगरी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. रुग्णालयातून त्यांचा मृतदेह दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कळवा येथील घरी नेण्यात आला. साठे यांच्या पार्थिवावर त्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ऐन धुळवडीच्या दिवशी साठे यांचे कर्तव्यावर निधन झाल्याच्या घटनेनंतर पोलिसांवर असलेल्या कामाच्या ताणाबाबत पुन्हा एकदा पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

(sakal,11 march)

No comments: