Monday, March 30, 2009

दोन्ही पाय गमावण्याची महिला डॉक्‍टरवर वेळ

मृत्यूशी झुंज ः रेल्वेरूळ ओलांडताना अपघात

घाई-गडबडीत रेल्वेरूळ ओलांडताना धावत्या लोकलखाली आल्याने ऍन्टॉप हिल येथे राहणाऱ्या एका महिला डॉक्‍टरवर दोन्ही पाय गमवावे लागण्याची वेळ आली आहे. वडाळा रेल्वेस्थानकात आज सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेत जखमी झालेल्या डॉक्‍टरवर शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिला डॉक्‍टरची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
ज्योती गणेश शेट्टी (33) असे या महिला डॉक्‍टरचे नाव आहे. वांद्रे येथील भाभा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. शेट्टी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास टॅक्‍सीने वडाळा रेल्वेस्थानकात आल्या. त्यानंतर घाईघाईत लोकल पकडण्यासाठी त्यांनी रेल्वेरूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुळामध्ये चप्पल अडकल्याने त्या रुळावरच पडल्या. या वेळी छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या रेल्वेने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातानंतर रेल्वेरुळाच्या शेजारीच पडलेल्या ज्योती शेट्टी यांना काही प्रवासी व रेल्वे पोलिसांनी उचलून शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात त्यांच्या दोन्ही पायांचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांचे दोन्ही पाय काढण्याबाबतचा निर्णय डॉक्‍टर घेतील, अशी शक्‍यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. या घटनेची नोंद वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, या डॉक्‍टरची प्रकृती गंभीर असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
रेल्वेरूळ ओलांडणे धोकादायक असल्याच्या सूचना केंद्रीय मध्यवर्ती सूचना कक्षाकडून वारंवार केल्या जातात; मात्र अनेकदा उच्चशिक्षित व्यक्तीही या सूचनांकडे डोळेझाक करून रेल्वेरूळ ओलांडत असतात. अशाच प्रकारे वेळ वाचविण्याचा प्रयत्न केल्याने डॉ. शेट्टी यांना पाय गमवावे लागणार आहेत, अशी माहिती रेल्वेचे पोलिस उपायुक्त वसंत कोरगावकर यांनी दिली.


(sakal,23 march)

No comments: