Tuesday, March 17, 2009

पोलिस महासंचालकाचे नाव आज जाहीर होणार

जयंत पाटील : रॉय यांचे नावही चर्चेत

राज्याचे पोलिस महासंचालक अनामी रॉय यांची नियुक्ती उच्च न्यायालयाने बेकायदा ठरविल्यानंतर त्यांच्या जागी नवीन पोलिस महासंचालकांच्या नावाची घोषणा उद्या (ता. 4) करण्यात येणार आहे. या पदाकरिता गृहनिर्माण विभागाचे महासंचालक एस. एस. विर्क यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असले, तरी विद्यमान पोलिस महासंचालक अनामी रॉय यांचेदेखील नाव चर्चेत असल्याचे गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. खुद्द गृहमंत्री जयंत पाटील यांनीही या पदासाठी उद्या घोषणा करणार असल्याचे प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले.
तीन अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून राज्य सरकारने अनामी रॉय यांची गेल्या वर्षी पोलिस महासंचालकपदावर निवड केली. उच्च न्यायालयाने ही निवड बेकायदा ठरवीत या पदावर नव्या अधिकाऱ्याची निवड करण्यासाठी राज्य सरकारला चार आठवड्यांची मुदत दिली. या आदेशानंतर सरकारकडून पुढील निर्णय होईपर्यंत राज्याचे विद्यमान पोलिस महासंचालक दीर्घ रजेवर गेले आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या पदावर तातडीने नियुक्ती होणे आवश्‍यक असल्याचे लक्षात घेता या पदावर नवीन अधिकाऱ्याची उद्या घोषणा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नवीन पोलिस महासंचालक पदासाठी रॉय यांच्यासह चार अधिकाऱ्यांच्या नावाचा विचार होत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात या पदाकरिता फक्त गृहनिर्माण विभागाचे महासंचालक एस. एस. विर्क आणि विद्यमान पोलिस महासंचालक अनामी रॉय यांच्यातच स्पर्धा असल्याचे गृहखात्यातील सूत्रांनी सांगितले

(sakal,3 march)

No comments: