Monday, March 30, 2009

चाकूधारी चोरट्यावर जिगरबाज तरुणाची झडप

चोरट्याला मुस्क्‍या ः ओव्हल मैदानाने अनुभवला थरार

संध्याकाळची कातरवेळ. चर्चगेटचं प्रसिद्ध ओव्हल मैदान. गप्पा-गोष्टींत गढून गेलेले गिरी दाम्पत्य. अशा वेळी एकट्याच बसलेल्या या दाम्पत्याजवळ तीन अनोळखी व्यक्ती येतात. लकाकते चाकू बाहेर काढतात आणि त्याच्या धाकाने गिरी दाम्पत्याकडील पाच हजार रुपयांची रोकड आणि दोन हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून ते पळून जाऊ लागतात; पण तेवढ्यात तपन गिरी प्रसंगावधान दाखवतात. एका चोरट्याला झडप घालून पकडतात आणि चोप देत पोलिस ठाणे गाठतात...

चर्चगेट येथील "ए' रोडवर पुष्पाकुंज इमारतीत राहणारे तपन अनिल गिरी (32) एका खासगी कंपनीत कामाला आहेत. काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ते त्यांची पत्नी पूजा हिच्यासोबत महर्षी कर्वे रोडवरील प्रसिद्ध ओव्हल मैदानात बसले होते. पत्नीशी हितगूज करीत असतानाच त्यांच्या पुढ्यात उभ्या राहिलेल्या तिघा चोरट्यांकडील लखलखता सुरा बघून एक क्षण त्यांचीही गाळण उडाली. चोरट्यांनी त्यांना धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा सात हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला आणि पळायला सुरवात केली. या वेळी त्यांच्यातील एक जण मागे राहिल्याची संधी साधून तपन गिरी यांनी त्याला काही कळायच्या आत पुढच्याच क्षणी त्याच्यावर झडप घातली. तपन गिरीनी चोरट्याची चांगलीच धुलाई करायला सुरवात केली. तोपर्यंत हा प्रकार त्यांची पत्नी पूजा (28) हिने तिथे असलेल्या काही मंडळींच्या कानावर घातला. रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य नागरिकांच्या मदतीने गिरी यांनी या चोरट्याला आझाद मैदान पोलिस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. दिनेश वासुदेव भारसाणी (23) असे त्याचे नाव आहे. गिरी यांना धमकावण्यासाठी वापरलेला चाकू भारसाणी याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. चर्चगेट परिसरातच भुरट्या चोऱ्या करणाऱ्या भारसाणीने पोलिसांना त्याच्या साथीदारांची नावे सांगितली आहेत. थापा, आझाद अशी त्याच्या पळून गेलेल्या साथीदारांची नावे आहेत. आझाद मैदान पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने चोरट्याला पकडणाऱ्या गिरी यांचे पोलिस आणि चर्चगेट परिसरातील नागरिक कौतुक करीत आहेत.

(sakal,28 march)

No comments: