Tuesday, March 17, 2009

भारतीय नौदलाचा "सिंदबाद' जगप्रवासाला

लाटांवर स्वार ः 15 ऑगस्टपासून समुद्र सफरीला प्रारंभ

भारतात तयार करण्यात आलेल्या बोटीतून खवळलेल्या समुद्राच्या लाटांवर स्वार होत पृथ्विप्रदक्षिणा करण्यासाठी भारतीय नौदलाचा एक अधिकारी सज्ज झाला आहे. गोव्याहून मुंबईतील नौदलाच्या पश्‍चिम विभागीय नौदल तळावर पोचलेला दीपक दोंदे हा नौदल अधिकारी आवश्‍यक ते प्रशिक्षण घेतल्यानंतर येत्या 15 ऑगस्टपासून मुंबईतूनच जगप्रवासाला निघणार आहे.

भारतीय नौदलाच्या "सागर परिक्रमा' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पानंतर सागरी मार्गाने एकट्याने प्रवास करणारा दीपक दोंदे पहिला भारतीय नौदल अधिकारी ठरणार आहे. तीन वर्षांहून अधिक काळ या प्रकल्पासाठी गोवा येथे "म्हादाई' ही बोट बनवून आज याच बोटीने दीपक दोंदे मुंबईत पोचले. नौदलाचे पश्‍चिम विभागीय प्रमुख वॉइस ऍडमिरल जे. एस. बेदी यांनी एका कार्यक्रमात या उपक्रमाची घोषणा केली. मुंबईत असलेल्या नौदल तळावर दोंदे प्रवासाकरिता आवश्‍यक असलेले प्रशिक्षण घेणार आहेत. नऊ महिन्यांच्या या प्रवासात दोंदे ऑस्ट्रेलियाच्या फ्रेमेन्टस, न्यूझीलंडच्या ख्रिस्तचर्च, दक्षिण अमेरिकेत पोर्ट सॅटन्ली आणि दक्षिण आफ्रिकेत केपटाऊन या चार ठिकाणी थांबणार आहेत. या प्रवासात खाण्याचे साहित्य, प्रथमोपचारसासाठी आवश्‍यक ती औषधे, आपत्कालीन वेळी बोटीची दुरुस्ती करण्यासाठीची उपकरणे यांच्यासह खूपशी पुस्तके नेण्याचा आपला मानस असल्याचे दोंदे यांनी पत्रकारांना सांगितले.
सुमारे एकवीस हजार नॉटिकल मैलांच्या या जगप्रवासाच्या प्रकल्पासाठी साडेसहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या या बोटीसाठी परदेशातूनही आवश्‍यक ते साहित्य मागविण्यात आले आहे. मुंबईतील प्रशिक्षण काळात दोंदे मॉरिशस येथे बोटीने जाऊन परत मुंबईत येणार आहेत. यापूर्वी नौदलाच्या आयएनएस - तारांगिनी या बोटीसह ते अमेरिकेला गेले होती, अशी माहितीही पश्‍चिम विभागीय नौदलाचे प्रमुख वॉइस ऍडमिरल जे. एस. बेदी यांनी पत्रकारांना दिली. दोंदे यांच्या या प्रवासाची इत्थंभूत माहिती व्हावी, यासाठी बोटीवर कॅमेरे लावण्यात येणार असल्याचेही बेदी या वेळी म्हणाले.

(sakal,5 march)

No comments: