Monday, March 30, 2009

खंडणीप्रकरणी शिवसेना नगरसेवक विजय वाशिर्डे यांना अटक

अन्य सहा जण जेरबंद ः पांडवपुत्र टोळीसाठी खंडणी मागितली

घरखरेदीच्या एका व्यवहारात 13 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी भुलेश्‍वर येथील शिवसेना नगरसेवक विजय वाशिर्डे (वय 60) यांच्यासह सात जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. वाशिर्डे यांनी ही खंडणी पांडवपुत्र टोळीसाठी मागितल्याची कबुली पोलिसांना दिल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी पत्रकारांना दिली.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक- 217 चे नगरसेवक असलेल्या वाशिर्डे याच्यासोबत अटक केलेल्या अन्य आरोपींची नावे मुकेश सौदागर (32), झाकीर शेख (32), निसार शेख (43), तबरेज मकबुल ( 28), लक्ष्मण किरण (27), सिद्धार्थ मयेकर ऊर्फ सिद्धू (30) अशी आहेत. दोन महिन्यांपूर्वी कुंभारवाडा येथील एका घराच्या विक्रीचा व्यवहार 25 लाख रुपयांना करण्यात आला होता. घर खरेदी करणाऱ्याने त्याच्या मूळ मालकाला व्यवहाराची सगळी रक्कम दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतरच देणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे घराच्या मालकाने दुरुस्तीचे काम करायला सुरुवातही केली. याच इमारतीत राहणारा पांडवपुत्र टोळीचा सदस्य सौदागर याने ही माहिती टोळीचा सूत्रधार सिद्धार्थ मयेकर ऊर्फ सिद्धू याला दिली. यानंतर सिद्धूने घराच्या मूळ मालकाकडे दुरुस्तीचे काम सुरू ठेवण्यासाठी 13 लाख रुपयांची खंडणी मागितली. घरमालकाने सिद्धूला सुरुवातीला 20 हजार रुपये देण्याची संमती दर्शविली. त्यानुसार सिद्धूने त्याच्याकडून 20 हजार रुपये घेतले; मात्र खंडणीची पूर्ण रक्कम मिळेपर्यंत काम थांबविण्यासाठी त्याने घराला टाळेही ठोकले. यानंतर त्रस्त घरमालकाने याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यानुसार आज घरमालकाने सिद्धूला खंडणीची रक्कम देण्यासाठी काळबादेवी येथील हॉटेलमध्ये बोलावले. या ठिकाणी सिद्धूने त्याचे साथीदार सौदागर, झाकीर आणि निसार यांना पाठविले. या वेळी आपल्याकडे पुन्हा खंडणीची मागणी करणार नाही अशी खात्री घरमालकाने या गुन्हेगारांकडून मागितली. तेव्हा त्यांनी घरमालकाला नगरसेवक वाशिर्डे बसलेल्या अन्य एका हॉटेलमध्ये नेले. तेथे खंडणीची रक्कम घेत असताना वाशिर्डे आणि तिघा जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. वाशिर्डे यांनी ही रक्कम सिद्धूसाठी घेतल्याची कबुली पोलिस
ांना दिल्याचे सहपोलिस आयुक्त मारिया यांनी या वेळी सांगितले.

(sakal,24 march)

No comments: